उपाध्यक्षांसह सभापतींचा बंडाचा झेंडा!
By admin | Published: January 18, 2016 11:03 PM2016-01-18T23:03:00+5:302016-01-18T23:33:41+5:30
जिल्हा परिषदेत राजीनामा नाहीच : मार्चपर्यंत संधी देण्याबाबत पक्षाकडे पत्र
सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनंतर इतर पदाधिकारी सोमवारी राजीनामा देणार, असे पक्षाकडून ठामपणे सांगण्यात आले होते. मात्र, आता उपाध्यक्षांसह चौघा सभापतींनीही पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकाविला आहे. राजीनामा तर दिला नाहीच; उलट या पाचजणांनी पक्षाकडे पत्र दिले आहे. त्यामध्ये ३१ मार्चपर्यंत काम करण्याची संधी द्या, अन्यथा पदासह पक्षाचाही राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे सबकुछ राष्ट्रवादी अशी परिस्थिती आहे. पाच वर्षांच्या काळातील शेवटच्या अडीच वर्षांसाठी इतर मागासवर्गसाठी अध्यक्षपद राखीव झाले. त्यावेळी माण तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार, असे वातावरण होते. पण, विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यावेळी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असणाऱ्या रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात अध्यक्षपद नेले. त्यानंतर पक्षात रुसवे-फुगवे सुरू झाले.
आजही ते दिसून येत आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वांनी सांगूूनही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांशिवाय इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला नाही. गेल्या दहा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या व्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नाही. तीन दिवसांपूर्वी पक्षाकडून सांगितले की, इतर पदाधिकारी हे सोमवारी राजीनामा देतील; पण सोमवारीही टाळाटाळ झाली. आता तर उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण सभापती अमित कदम, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे आणि महिला व बालकल्याण समिती सभापती कल्पना मोरे यांनी बंडाचा झेंडा फडकाविला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावाने पत्रच दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून काम करताना विधानसभा व ग्रामपंचायत निवडणूक लागली. आचारसंहितेमुळे काम करता आले नाही. विकासात्मक व धोरणात्मक निर्णय घेता आले नाहीत. आम्हा सर्वांवर अन्याय झाल्याची भावना झाली आहे. त्यामुळे पत्राद्वारे बाजू मांडत आहोत. पक्षाकडून दि. ३१ मार्चपर्यंत काम करण्याची संधी मिळावी. आम्ही ३१ मार्च रोजीचे राजीनामे पत्रासोबत पाठवत आहोत. (प्रतिनिधी)