स्वराज्याचे प्रवेशद्वार वर्धनगड गाव दत्तक

By Admin | Published: December 18, 2014 09:39 PM2014-12-18T21:39:51+5:302014-12-19T00:23:16+5:30

नितीन बानगुडे-पाटील : गडावर भुयारी मार्ग, दारूगोळा भांडाराची शक्यता व्यक्त

Vardhanagad village adoption of Swarajya Gate | स्वराज्याचे प्रवेशद्वार वर्धनगड गाव दत्तक

स्वराज्याचे प्रवेशद्वार वर्धनगड गाव दत्तक

googlenewsNext

पुसेगाव : ‘सातारच्या महादेव डोंगररांगात वसलेला वर्धनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे प्रवेशद्वार होता. प्राचीन काळात या किल्ल्यावर असणारे; पण काळाच्या ओघात गडावर जमिनीखाली गेलेले मोठ-मोठे महाल, कक्ष, भुयारी मार्ग, चोरट्या वाटा, अन्नधान्य कोठार व दारूगोळा साठ्याचे भांडार असण्याची शक्यता आहे. म्हणूनच या गडाच्या संवर्धन व उत्खननासाठी रात्रीचा दिवस करणार असून, ३५० वर्षांपूर्वीच्या गडावरील इतिहासाच्या पुसत चाललेल्या खुणा पुन्हा जागा करण्यासाठीच वर्धनगड गाव दत्तक घेतले आहे. वर्धनगड हे भविष्यात मोठे पर्यटनस्थळ होईल,’ असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.
वर्धनगड, ता. खटाव आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरपंच अर्जुन मोहिते, विठ्ठल सावंत, अर्जुन कुंभार, रहेमान भालदार, पांडुरंग फडतरे, किशोर घोरपडे, संभाजी जाधव, मनीष कदम, संतोष कदम, विकास जाधव, वसंत फडतरे, रमेश कुंभार, तुकाराम चव्हाण, सचिन सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, ‘वर्धनगड येथे दहाव्या शतकात राजा भोज यांनी बांधलेला अभेद्य किल्ला. दुष्काळी पट्ट्यात हा किल्ला असून, हिंंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतल्याची नोंद इतिहासातात आजही सापडते. स्वराज्याचा रखवालदार असणारा हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे प्रवेशद्वार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याच्या तटबंदी अधिक भक्कम करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तटबंदीत उगवलेली झाडे तोडण्याचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा-पंढरपूर रस्त्यालगत गावाच्या प्रवेशद्वाराजवळ छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)


शिव संग्रहालय उभारणार...
उत्खननादरम्यान सापडलेला जुना ठेवा व ऐतिहासिक वस्तू जतन करण्यासाठी शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. शिवकालीन पाणीपुरवठ्याची साक्ष देणाऱ्या गडावरील पाण्याच्या टाक्या साफ करून गावाच्या नागरिकांना त्या पाण्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. तसेच गाव दत्तक योजनेअंतर्गत या गावातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी शेतीपूरक उद्योगधंदे या गावात सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ता करण्याची विनंती सरपंच अर्जुन मोहिते यांनी केली.

Web Title: Vardhanagad village adoption of Swarajya Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.