महिलांनी लुटले सत्तेचे वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:23+5:302021-03-04T05:14:23+5:30
खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गावात सक्षम महिला निवडून आल्या असून, त्यापैकी अनेक सरपंच उपसरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. ...
खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गावात सक्षम महिला निवडून आल्या असून, त्यापैकी अनेक सरपंच उपसरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभात करण्यात आला. त्यामुळे सतीचं वाण घेणाऱ्या महिलांनी खऱ्या अर्थाने सत्तेचं वाण लुटत महिला सबलीकरणाचा धडा गिरवला.
खंडाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंदोरी येथे हळदी-कुंकू व ‘वाण आरोग्याचं’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुचेता हाडंबर, सरचिटणीस सुचिता साळवे, वृक्षाली घाडगे, पिंपरे बुद्रूकच्या सरपंच कविता धायगुडे, कराडवाडीच्या सरपंच जनाबाई कराडे, कोरेगावच्या सरपंच रेश्मा गोवेकर, बावकलवाडीच्या उपसरपंच चैत्राली जाधव, संध्या खुंटे, नर्मदा कोकरे, बायडाबाई ठोंबरे, शलाका ननावरे, कल्पना सरक, पल्लवी निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसने महिला सबलीकरणासाठी मोठे योगदान दिले आहे. राजकारणात महिलांना अर्धा वाटा मिळण्यासाठी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला ताठ मानेने काम करीत आहेत. ग्रामीण भागातील महिलांसाठी यापुढेही विशेष योजना राबविल्या जातील, असे जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे यांनी आश्वासित केले.
प्रत्येकाने महिलांचा सन्मान करणे गरजेचे असून आज सर्वच क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे तालुका महिला अध्यक्षा सुचेता हाडंबर यांनी स्पष्ट केले. यावेळी आरोग्य विभागाच्यावतीने महिलांचे रक्तदाब व हिमोग्लोबीन तपासणी करून लसीकरण अधिकारी शलाका ननावरे यांनी कोविड लसीबाबत महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्यसेविका, नूतन महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
०३खंडाळा
फोटो - अंदोरी येथे ‘वाण आरोग्याचं’ या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.