वरुणराजा साताऱ्यात आला मुक्कामाला!
By admin | Published: June 26, 2017 01:53 PM2017-06-26T13:53:53+5:302017-06-26T13:53:53+5:30
हंगामात प्रथमच संततधार : कास, बामणोली परिसरातही जोर वाढल्याने डोंगर हिरवेगार
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. २६ : पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यातील बहुतांश भागात पावसाने यापूर्वीच हजेरी लावली. परंतु सातारा शहरात या हंगामात एकही दमदार पाऊस झाला नव्हता. हंगामात प्रथमच रविवारी रात्रभर पाऊस पडत होता.
साताऱ्यात अद्यापपर्यंत मुसळधार पाऊस झालेला नसल्याने भूगभार्तील पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. साहजिकच नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली होती. शहरात रविवारी रात्रभर पाऊस पडत होता. त्यामुळे जमिनीत ओल निर्माण होण्यास मदत झाली आहे.
यवतेश्वर, कास पठार, बामणोली परिसरात चांगला पाऊस सुरू झाला असल्याने परिसरातील डोंगररांगा हिरवेगार बनल्या आहेत. आणखी काही दिवस संततधार पाऊस झाला तर कास तलावातील पाणी साठा वाढण्याची शक्यता आहे.
विद्युत पुरवठा खंडित
शहरात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने विद्युतपुरवठा अधूनमधून खंडित होत होता. वीजवाहक तारांमधील ताण कमी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.