दुर्गामातेच्या स्वागताला वरुणराजा अवतरला
By admin | Published: October 2, 2016 12:45 AM2016-10-02T00:45:39+5:302016-10-02T00:45:39+5:30
जयघोषाचा गजर : खंडाळ्यात भर पावसात हलगी कडाडली; दुर्गादेवीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रतिष्ठापना
सातारा/खंडाळा : घटस्थापनेदिवशी साताऱ्यातील चौकाचौकांत दुर्गामातेच्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. यानिमित्ताने शनिवारी दिवसभर दुर्गामातेची मिरवणूक काढण्यात आली. त्यातच सायंकाळी चारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुर्गामातेच्या स्वागताला वरुणराजानेही हजेरी लावली.
खंडाळा तालुक्यात दुर्गोत्सवाची देदीप्यमान परंपरा निर्माण केलेल्या खंडाळ्यातील गजराज मित्र मंडळाने यावर्षीही नावलौकिक कायम राखला. पारंपरिक आणि सांस्कृतिक दरबारी मिरवणुकीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. आबालवृद्धांच्या उपस्थित शहर दुर्गामातेच्या जयजयकाराने दुमदुमले.
ढोल-ताशांचा गजर, वाघ्या मुरळीचे नृत्य, पंजाबी भांगडा नृत्य, शिवकालीन मैदानी खेळ, हलगीचा कडकडाट भगव्या झेंड्यांची निशाणी, घोडेश्वर, कार्टून खेळ अशा विविधतेने नटलेली दुर्गामातेची मिरवणूक ही गजराज मंडळाची ओळख निर्माण झाली आहे.
मंडळाचे संस्थापक दिगंबर गाढवे, अध्यक्ष शैलेश गाढवे यांच्या योग्य नियोजनातून दुर्गामातेची मिरवणूक पार पडली. आमदार कमरंद पाटील, अॅड. शामराव गाढवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा व महाआरती झाली.
गजराज मंडळासह, शिवशक्ती ग्रामविकास मंडळ, छत्रपती शिवाजी चौक सांस्कृतिक मंडळ, राजवलीबाबा मित्र मंडळ, भैरवनाथ तरुण मंडळ या मंडळांचीही दुर्गादेवी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. (प्रतिनिधी)
शारदीय नवरात्रोत्सवास मांढरगडावर प्रारंभ
४मांढरदेव : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास दि. १ आॅक्टोबरपासून पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली.
४नवरात्रीतील नऊ दिवस देवीची विविध रूपांमध्ये आकर्षक पूजा बांधण्यात येते. नवरात्र कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी अहोरात्र उघडे असते. उत्सव काळात विविध प्रकारचे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच भजन, कीर्तन, देवीची गाणी आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सव काळात नवरात्राचे व्रत करणाऱ्या महिला व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. दरम्यान, देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
४नवरात्रोत्सवात अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवस्थानच्या वतीने जादा कर्मचारी नेमले आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेराद्वारे परिसरातील घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक वेताळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस, होमगार्ड, विशेषत: महिला पोलिसांची कुमक मागवून परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मलटणमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
मलटण : मलटण नगरीचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळूबाई मंदिर येथे शनिवारपासून मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. या उत्सवासाठी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची आरास करण्यात आली आहे. दुपारी देवीची आरती करून व नैवेद्य दाखवून देवी समोर घटस्थापना करण्यात आली.