साताऱ्यात हाॅस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठी वशिलेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:43+5:302021-04-19T04:36:43+5:30
सातारा : शहरामध्ये सध्या वशिलेबाजीसाठी एकमेकांचे फोन खणाणत असून, ही वशिलेबाजी इतर कारणांसाठी नसून रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी सुरू ...
सातारा : शहरामध्ये सध्या वशिलेबाजीसाठी एकमेकांचे फोन खणाणत असून, ही वशिलेबाजी इतर कारणांसाठी नसून रुग्णांना हाॅस्पिटलमध्ये बेड मिळण्यासाठी सुरू असल्याचे समोर येत आहे. ज्यांचा वशिला चालतोय त्या ठिकाणी बेड उपलब्ध होतायत, पण ज्यांचा वशिलाच नाही, असे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हतबल झाले आहेत. या वशिलेबाजीमध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात सध्या काेरोनाने हाहाकार माजविला आहे. जिल्ह्यातील १७ कोरोना सेंटर आणि इतर ४८ खासगी रुग्णालय अशा एकूण ६५ रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार केले जात आहेत. कोरोना सेंटरमध्ये १ हजार १६३ बेडची, तर इतर ४८ रुग्णालयांमध्ये १ हजार ३४९ बेडची क्षमता आहे. म्हणजे २ हजार ५१२ रुग्णांवर एकाचवेळी उपचार होतील, अशी क्षमता असणारी रुग्णालये कार्यरत आहेत. मात्र, गत काही दिवसांपासून या सर्व रुग्णालयांमध्ये एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते. वास्तविक सर्वसामान्य रुग्णांना बेड कोणत्या रुग्णालयांमध्ये शिल्लक आहेत, हे समजतच नाही. कारण जिल्हा प्रशासनाने दिलेली वेबसाइट ही अपडेट नसल्याने माहिती मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे अनेक रुग्ण बाधित रुग्णाला सोबत घेऊन शहरातील रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. मात्र, तरीही त्यांना बेड शिल्लक नसल्याचेच सांगण्यात येते, पण ज्यांचा वशिला दांडगा आहे ते लोक मात्र अमुक व्यक्तीमुळे आमच्या नातेवाइकाला बेड मिळाला, असे सांगत असतात. तेव्हा खरोखरच ज्यांचा कुठे वशिला नाही. कोणी ओळखीचे नाही, अशा लोकांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चाैकट : सकाळी रिकामे..अन् संध्याकाळी फुल्ल
कोरोनाबाधित अहवाल आल्यानंतर अनेकजण सकाळी रुग्णालयात गेल्यानंतर बेड त्यांना मिळतो, पण रात्री गेल्यानंतर शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. खरं रात्रीच्या सुमारास घरात बाधिताची प्रकृती अचानक बिघडली, तर रात्री रुग्णाला घेऊन जाणार कुठे, असा प्रश्न नातेवाइकांसमोर पडतोय. त्यामुळे नेमके बेड शिल्लक कुठे आहेत. नसेल तर काय करायला हवे, याची माहती प्रशासनाने रोजच्या रोज दिली तर नागरिकांची दिशाभूल होणार नाही.
चाैकट : घरी तरी गोळ्या द्या..
अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध होणे शक्य नाही. मात्र, जे घरी राहून उपचार घेत आहेत. अशा बाधितांना घरी औषधे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने नियोजन करायला हवे. बाधितांचे नातेवाईक त्यांच्यासोबत राहत नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून कोणी घरी गेल्यास रुग्णांना दिलासा तर मिळेलच, शिवाय उपचारही होतील, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.