थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 05:07 PM2021-12-23T17:07:57+5:302021-12-23T17:08:49+5:30

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून जंगल सफारी करत वन्यसंपदेचा अभ्यास करत भटकंती करता येते. वासोट्याच्या रौद्र कड्यावरून व्याघ्रगड, नागेश्वर गुहा, चकदेव, पर्वत दर्शन आदी ठिकाणांचा नजारा पाहता येतो.

Vasota Fort closed for tourism on the backdrop of Thirty First | थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद

googlenewsNext

पेट्री : महाराष्ट्रभरातील ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला वनदुर्ग वासोटा किल्ला ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी पर्यटनासाठी बंद राहणार असल्याची माहिती बामणोली वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी दिली. नववर्ष स्वागत व सरत्या वर्षाला निरोप यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. काही उत्साही पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेता दरवर्षी तीन दिवस किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घातली जाते.

वासोटा जंगल भटकंती एक रोमांचक सफर आहे. वाघासारखा दबा धरून अरण्याच रक्षण करणारा, दाट झाडीची झूल पांघरलेला, कोयनेच्या घनदाट जंगलातला हा एक वनदुर्ग म्हणजे किल्ले वासोटा ऊर्फ व्याघ्रगड. साहसाची अनुभूती देणारा, रानामध्ये वसलेला, दुर्गम असणारा हा किल्ले वासोटा म्हणजे जावळीच्या मुलूखातील एक दुर्गरत्नच. जावळी खोऱ्यातून वाहणारी कोयना नदी आणि या कोयनेच्या शिवसागर जलाशयाच्या पलीकडे घनदाट जंगलात हा वासोटा किल्ला वसलेला आहे.

पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलागकडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे. वासोटा भटकंती मुख्यतः बोटीने प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. कोयनेच्या अभयारण्यातील निळ्याशार शिवसागर जलाशयातील आल्हाददायक सफरीचा आनंद मिळतो.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून जंगल सफारी करत वन्यसंपदेचा अभ्यास करत भटकंती करता येते. वासोट्याच्या रौद्र कड्यावरून व्याघ्रगड, नागेश्वर गुहा, चकदेव, पर्वत दर्शन आदी ठिकाणांचा नजारा पाहता येतो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वनसंरक्षणाच्या दृष्टीने तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरत्या वर्षीच्या शेवटी ३०, ३१ डिसेंबर, १ जानेवारी असे तीन दिवस पर्यटन बंद राहणार आहे. तसेच कोयना अभयारण्यात विनापरवानगी कोणी प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. -बाळकृष्ण हसबनीस, वनक्षेत्रपाल, बामणोली वन्यजीव विभाग

Web Title: Vasota Fort closed for tourism on the backdrop of Thirty First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.