वाठारला माणशी तीन लिटर पाणी...
By Admin | Published: January 10, 2016 10:53 PM2016-01-10T22:53:22+5:302016-01-11T00:50:32+5:30
जादा टँकरची मागणी : आगामी काळात वाग्देव महाराज रथोत्सव; जनावरांचा बाजार
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन गावचा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला बाराही महिने खासगी टँकरकडून पाणी
विकत घ्यावे लागत आहे. गावाने आता काही नवीन योजना राबविण्याचे काम हाती घेतले असले तरी सध्या भेडसावणाऱ्या पाणी टंचाईबाबत शासन मात्र या गावची चेष्टा करण्याचे काम करत आहे. या गावाला दररोज लागणाऱ्या पाण्याची गरज पाहता एका माणसाला केवळ तीन लिटर पाणी उपलब्ध होत आहे.
वाठार स्टेशन गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर देऊर येथील तळहिरा धरणाखाली आहे. मात्र गेल्या पाच या वर्षांत या धरणातच पाणी नसल्याने ही विहीर कोरडी पडली आहे. यामुळे वाठार स्टेशनला गेली कित्येक दिवसांपासून खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीने शासनाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्ताव देऊनही अद्याप या गावचा पाणी प्रश्न सुटलेला नाही.
ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वी कोरेगाव तहसीलदार, तसेच गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे पाण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार दररोज वीस हजार लिटर क्षमतेच्या सहा खेपा मागण्यात आल्या होत्या; परंतु प्रत्यक्षात दहा हजार लिटरचे सहा टँकर सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात या सहांपैकी केवळ दोन टँकरद्वारे पाणी गावाला दिले जात आहे. त्यामुळे सध्या वाठार स्टेशन गावाला पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे.
वाठार स्टेशनचा समर्थ वाग्देव महाराजांचा रथोत्सव दि. २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तसेच या रथोत्सवानिमित्त होणारा जनावरांचा वार्षिक बाजारही दि. १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी या काळात वाढीव सहा खेपा सुरू कराव्यात, अशी मागणी नुकतीच कोरेगावच्या तहसीलदार व
गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे.
याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून वाढीव पाण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याबाबत वाढीव पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा करूनही ते उपलब्ध होत नसल्याच्या भावना वाठार स्टेशन ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. (वार्ताहर)
दि.१३ ते २४ जानेवारी यादरम्यान, वाग्देव महाराजांचा रथोत्सव व जनावरांचा बाजार आहे. यामुळे वाठार स्टेशनमध्ये पाण्याची गैरसोय होऊ नये. याबाबत शासनाने पाणी टँकरमध्ये वाढ करावी. नवीन टँकरद्वारे या काळात पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन आम्ही संबंधितांना दिले आहे.
- महेश लोंढे, सरपंच वाठार स्टेशन
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पाण्याची समस्या कायम असते. त्यामुळे येथील जनतेला पाणीटंचाई सतत भासत असते. या भागातीलच वाठार स्टेशन हे महत्वाचे व मध्यवर्ती गाव आहे. तसेच येथे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी असते. मात्र, येथे पाण्याची टंचाई नेहमीच असते. वर्षातून काही महिने येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. येथील पाण्याची समस्या कायमस्वरुपी संपविण्याची मागणी होत आहे.