वेशीत पाटी ‘निर्मल’ची; आत वस्ती घाणीची

By admin | Published: December 6, 2015 10:59 PM2015-12-06T22:59:43+5:302015-12-07T00:28:10+5:30

ये रे माझ्या मागल्या : ‘निर्मल ग्राम’ योजनेला लोकसहभागाअभावी अनेक गावांतून खीळ

Vasundhati Pati 'Nirmal'; Dirt inside | वेशीत पाटी ‘निर्मल’ची; आत वस्ती घाणीची

वेशीत पाटी ‘निर्मल’ची; आत वस्ती घाणीची

Next

नम्रता भोसले --खटाव -अनेक योजना शासन राबवत असते, त्याचा गाजावाजाही होतो; परंतु या कोणत्याही सरकारी योजनेत जनतेचा मनापासून सहभाग नसेल तर चांगल्या योजनेचा कसा बोजवारा उडतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे निर्मल ग्राम योजना. ‘निर्मल ग्राम’ योजना चांगल्या हेतूने शासनाने सुरू केली. या योजनेचा जागर करण्यात आला. अनेक गावे सक्रिय सहभाग घेतले; परंतु आता मात्र बऱ्याच गावांमधून पुन्हा पूर्वीचेच चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक निर्मल गावे पुन्हा घाणीच्या व कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहेत. ही योजना अतिशय चांगली आहे. या योजनेमुळे अनेक गावांतील लोकांनी स्वच्छतेचा ध्यास घेऊन आपले गाव कसे निर्मल व स्वच्छ बनेल, याकडे लक्ष देऊन कामे केली. या योजनेमुळे स्वच्छतेची जाणीव जागृती झाली; परंतु काही गावांतून ही योजना सरकारी कागदावरच राहिली. काही गावांतून या योजनेला गावातील लोकांचा प्रतिसाद व आवश्यक असणारा सहभाग म्हणावा तसा मिळाला नाही. परंतु अनेक लोकसंख्येने लहान व मर्यादित असणाऱ्या गावात मात्र या योजनेमुळे गावाच्या वेशीपासून नदीच्या पाणवठ्यापर्यंत स्वच्छतेचा जागर झाला. यामुळे ही गावे निर्मल झाली, अशा गावांतून काही ठिकाणी हगणदारीमुक्त करण्यासाठी पहारेकरी नेमले गेले. प्रसंगी अशा लोकांना दंडात्मक शिक्षा, प्रसंगी गांधीगिरीचाही वापर करण्यात आला. त्यांना फूल भेट देऊन त्यांना लाजवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. रस्त्यावर घाण करणाऱ्या लोकांना शिक्षाही करण्यात आल्यामुळे बऱ्याच गावांत सुलभ शौचालयेही झाली.
गावातील महिला मंडळ, बचत गट तसेच तरुण मंडळे व ग्रामस्थांचा सहभाग वाढवून गावे स्वच्छ करण्यात आली. ही योजना राबवताना गावातील अंगणवाडी ताईपासून ते जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच या कामासाठी पळवले गेले.


आधी स्वागत... आता थंड
हा निर्मलतेच्या वाटेवर असणाऱ्या गावाना केंद्र शासनाची अशासकीय सेवा संस्थेची समितीद्वारे भेटी देऊन तपासणीचा फार्स दाखवण्यात आल. विशेष म्हणजे, या कमिटीचा थाटही राजासारखाच होता. या कमिटीचे अगदी वेशीत स्वागत करून त्यांना वाजत-गाजत गावात आणण्यापासून ते गुढ्या उभारून त्यांचे स्वागत करण्यात आले. ही कमिटी संपूर्ण जिल्हाभर फिरली. काही ठिकाणी या योजनेच्या कामी झालेल्या खर्चापेक्षा कमिटीच्या स्वागताला खर्च अधिक आला, अशी ही सरकारी योजना वाजत-गाजत गावागावांमध्ये आली आणि पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

ही योजना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. शासनस्तरावर प्रयत्न होत असताना यामध्ये लोकांची मानसिकताही तितकीच महत्त्वाची आहे. पंचायत समिती स्तरावर आजही ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- प्रभावती चव्हाण,
सभापती, पंचायत समिती खटाव

महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा नेहमी संदेश दिला आणि हेच आपण सर्वजण विसरलो आहोत. खेडी सुधारली तर देश सुधारेल, हा त्या पाठीमागचा हेतू होता. खरंतर ‘निर्मल ग्राम’ ही योजना राबविण्याची वेळ शासनावर येऊच नये.
- संजय भगत,
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Vasundhati Pati 'Nirmal'; Dirt inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.