‘व्हायरस’च्या नावाखाली वटवाघुळ बदनाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:22+5:302021-06-24T04:26:22+5:30

कऱ्हाड : महाबळेश्वरच्या गुहा असोत अथवा कऱ्हाडचा कृष्णाकाठ. या दोन्ही ठिकाणी हजारोंच्या संख्येने वाटवाघळं लटकलेली दिसतात. सध्या ‘निपाह’च्या भीतीमुळे ...

Vatvaghul notoriety under the name of 'virus'! | ‘व्हायरस’च्या नावाखाली वटवाघुळ बदनाम!

‘व्हायरस’च्या नावाखाली वटवाघुळ बदनाम!

googlenewsNext

कऱ्हाड : महाबळेश्वरच्या गुहा असोत अथवा कऱ्हाडचा कृष्णाकाठ. या दोन्ही ठिकाणी हजारोंच्या संख्येने वाटवाघळं लटकलेली दिसतात. सध्या ‘निपाह’च्या भीतीमुळे या वटवाघळांकडे संशयाने पाहिले जात आहे. मात्र, ही भीती खोडून काढतानाच वटवाघुळ नाहक बदनाम होत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

कृष्णा नदीचा काठ म्हणजे समृद्धतेचा धनी, सधनतेचा मानकरी. जिथं जिथं कृष्णा वाहिली, तो भाग धन्य झाला, असं म्हटलं जातं. कृष्णेनं तिच्या काठावर खऱ्याअर्थानं जीवसृष्टी वसवली. असंख्य जीवांना या नदीने जगण्याचं बळ दिलं. कऱ्हाडात तर याच नदीकाठी हजारो वटवाघळांनी आपली राहुटी केली आहे. मुळातच गर्दी, गोंधळ असणाऱ्या ठिकाणी तसेच मानवी वस्तीच्या परिसरात वन्यजीवांची राहुटी कमी प्रमाणात असते; पण कऱ्हाडात जिथं दररोज हजारोच्या संख्येनं माणसं वावरतात, त्याच परिसरात हजारोंच्या संख्येने वटवाघळंही राहतात. कऱ्हाडबरोबरच महाबळेश्वरमध्येही मोठ्या प्रमाणावर वटवाघुळ आढळून येत आहेत. मात्र, ‘एनआयव्ही’ या संशोधन संस्थेने महाबळेश्वरमधील काही वटवाघळांमध्ये ‘निपाह व्हायरस’ आढळल्याचा दावा केल्यानंतर या प्राण्याविषयी प्रचंड भीती निर्माण झाली आहे. मात्र, ही भीती बाळगण्याचे काहीच कारण नसल्याचे वटवाघुळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले.

‘वटवाघळाच्या शरीरात अनेक जीवघेणे ‘व्हायरस’ पूर्वीपासूनच आहेत. मात्र, त्याचा आणि मानवाचा काहीच संबंध नाही. ‘निपाह व्हायरस’ हा मलेशिया आणि चिनमधील काही फलाहारी वटवाघुळांमध्ये आहे. भारतीय वटवाघुळांमध्ये तो नाही. या ‘व्हायरस’मध्येच अनेक वेगवेगळ्याप्रकारचे विषाणू असून, तेच विषाणू महाबळेश्वरच्या वटवाघुळांमध्ये आढळल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. मात्र, त्यापासूनही काही धोका आहे की नाही, हे संशोधकांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे वटवाघुळांच्याविरोधात जाण्याचे किंवा त्यांच्यापासून भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही,’ असे डॉ. महेश गायकवाड यांचे म्हणणे आहे.

वटवाघळाची वैशिष्ट्ये :

निसर्गचक्र : वटवाघुळ हा निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक मानला जातो.

कीडनियंत्रण : किडे हे त्यांचे खाद्य असून, कीड नियंत्रणाचे काम ते करतात.

बीजप्रसारण : उंबरवर्गीय फळे ते खातात. त्यामुळे बीजप्रसारण होते.

निशाचर : निशाचर असल्यामुळे मानव आणि त्यांच्यात सामाजिक अंतर राहते.

- चौकट

पक्षी नव्हे... हे सस्तन प्राणीच!

वटवाघुळांना अनेकवेळा पक्षी म्हटले जाते. मात्र, ते एकप्रकारचे सस्तन प्राणीच असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. वटवाघुळ हा सस्तन प्राण्यातला अपवादात्मक पक्षीच असल्याचे सांगण्यात येते.

- चौकट

१२०० जगभरात

जगभरात फलाहारी आणि कीटकभक्षी अशी दोन वर्गातील वटवाघुळे आहेत. तसेच त्यांचे १ हजार २०० प्रकार असून, जगभरातील एकूण संख्येपैकी केवळ २० टक्के वटवाघुळे फलाहारी, तर ८० टक्के कीटकभक्षी आहेत.

- चौकट

१२३ भारतात

जगभरात आढळणाऱ्या विविध प्रजातींपैकी भारतात १२३ प्रकारची वटवाघुळे आहेत. त्यातही फलाहारी वटवाघुळांची संख्या कमी असून, जी फलाहारी आहेत, ती वटवाघुळे मोठ्या प्रमाणावर बीजप्रसारणाचे काम करीत असल्याचे डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले.

- कोट

मलेशियातील फलाहारी वटवाघुळांमध्ये आढळणारा ‘निपाह व्हायरस’ भारतीय वटवाघुळांमध्ये आजवर आढळलेला नाही. महाबळेश्वरच्या गुहांमध्ये स्थानिक अभ्यासकांबरोबर मी गेली कित्येक वर्षे वटवाघुळांवर संशोधन करीत आहे. मात्र, मला अथवा अन्य कोणालाही आजवर निपाह झालेला नाही. वास्तविक, महाबळेश्वरला आपण जे जंगल पाहतो, ते जंगल निर्माण करण्यात या वटवाघुळांचा मोठा वाटा आहे.

- डॉ. महेश गायकवाड, वटवाघुळ संशोधक

फोटो : २३केआरडी०१

कॅप्शन : प्रतिकात्मक

फोटो : २३केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाडच्या प्रीतीसंगमावरील बागेत असणाऱ्या झाडांवर हजारोंच्या संख्येने वटवाघुळ आढळून येतात.

Web Title: Vatvaghul notoriety under the name of 'virus'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.