‘येथे जन्मती वीर जवान’, घरागनीस एकजण सैन्यदलात सेवा बजावणारं गाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 05:41 AM2022-01-26T05:41:55+5:302022-01-26T05:45:40+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडापासून सैनिकी परंपरा असलेल्या या योद्धा गावास फार मोठा इतिहास आहे

‘Veer Jawan born here’, Gharaganis serving in the army is the greatest village in satara | ‘येथे जन्मती वीर जवान’, घरागनीस एकजण सैन्यदलात सेवा बजावणारं गाव

‘येथे जन्मती वीर जवान’, घरागनीस एकजण सैन्यदलात सेवा बजावणारं गाव

googlenewsNext

प्रज्ञा घोगळे - निकम

अपशिंगे मिलिटरी हे गाव साताऱ्याच्या दक्षिणेकडे १८ किमीवर वसलेले आहे. १६०० घरे आणि अवघी सहा हजार लोकसंख्या या गावात आहे. या गावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती भारतीय सैन्यामध्ये आपली सेवा देत आहे, तर शेकडो फौजी अधिकारी या गावाने देशाला समर्पित केले आहेत. या साऱ्यांनीच देशासाठी रक्त सांडताना आपल्या गावाचं आणि देशाचं नाव रोशन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडापासून सैनिकी परंपरा असलेल्या या योद्धा गावास फार मोठा इतिहास आहे. राजे शिवछत्रपती यांनी ज्यावेळी पन्हाळा किल्ला जिंकून घेतला त्या दिवसापासून किल्ल्यावर गडाचे प्रमुख गडकरी म्हणून छत्रपतींनी जबाबदारी दिली. उतुंग युद्ध कलेने पारंगत असलेले निकम मूळचे मांगले, ता. शिराळा येथील रहिवासी होते. छत्रपती यांनी आपली पन्हाळा गडावरून सुटका करून घेतल्यानंतर या किल्ल्याची सर्व जबाबदारी निकम यांनी घेतली. नंतरच्या काळात छत्रपती राजा शाहूंनी सातारा ही स्वराज्याची राजधानी जाहीर केली आणि आपला राज्य कारभार सातारा येथून सुरू केला. काही वर्षांनी इंग्रजांची राजवट लागू झाली आणि तिथेच निकम यांचा प्रवास खंडित झाला. तरीसुद्धा खचून न जाता निकम यांनी पहिले नागठाणे सातारा येथे काही दिवस मुक्काम केला. नंतरच्या काळात निकम यांनी अपशिंगे हे गाव निवडले आणि पुढील प्रपंच गावात स्थापित केला. 

येथे जन्मती वीर जवान ! हे उद्गार आतापर्यंत ऐकले होते. मात्र, सातारा जिल्ह्यातील अपशिंगे या गावाने हे उद्गार खरे असल्याचे दाखवून दिले आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर या जिल्ह्याची एक आगळीवेगळी अशी ओळख निर्माण झाली आहे. अपशिंगे या गावाने अनेक वीरपुत्रांना घडवले आहे.  या गावचा प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेला खास आढावा.

देश सेवा बजाविताना आले वीरमरण
सूर्यकांत शंकर निकम सन १९९५ रोजी सिक्कीम येथील गंगटोक येथे देश सेवा बजावित असताना शहीद झाले. मात्र, त्यांचा वसा आज त्यांची दोन्ही मुले सुधीर आणि सागर पुढे चालवत आहेत, तर त्यांच्या कुटुंबातील एकूण २५ सैनिक देशासाठी सेवा देत आहेत. यामुळे सूर्यकांत यांच्या पत्नी सातत्याने चिंतित असतात. पण, देशप्रेमापोटी निडर होऊन त्या मुलांना पाठिंबा देतात. 

..म्हणूनच जिवंत राहिलो
भैरू निकम यांनी पॅराशूट रेजिमेंटमध्ये सेवा दिली आहे. त्यांनी श्रीलंका येथे शांतीसेनेमध्ये भाग घेतला होता. श्रीलंकेतील रस्त्याने लष्करी वाहनाने जात असताना एलटीटीने केलेल्या ब्लास्टमध्ये वाहनात बसलेले १५ जवान शहीद झाले, तर त्यात दोन जण जखमी होऊन वाचले. त्यात भैरू निकम वाचले ते आजही अनुभव सांगताना देवावर विश्वास ठेवून मी सेवा बजावत होतो म्हणूनच जिवंत राहिलो, असे आवर्जून सांगतात.

सुभेदार रामचंद्र निकम यांच्याबाबत माहिती देताना हेमंत निकम यांनी सांगितले की, दुसऱ्या महायुद्धात भारत-पाक, भारत-चीन अशा युद्धांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले सैनिक होते. त्यांनी या महायु्द्धाच्या अनेक गोष्टी सांगताना ते भयावह चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे. ते अटलरी रेजिमेंटमध्ये सेवा देऊन आले होते. ते त्यांचा अनुभव सांगताना म्हणायचे एक एक क्षण मुठीत जीव घेऊन काढला. आई-वडिलांचे स्मरण करत देशसेवा करत मायदेशी परतलो.
आनंदराव सूर्यवंशी हे कारगिल युद्धात सीमारेषेवर दहशतवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगात जखमी झाले. मात्र, आज ही त्यांचा मुलगा नेव्हीमध्ये सेवा देत आहे.

पहिल्या महायुद्धात ४६ जवान शहीद
निकम कुटुंबाची पुढे संख्या वाढली आणि इंग्रजांनी आपल्या सैन्यात लोकांना भरती करून पाहिल्या विश्व युद्धात भारतातून दीड दोन लाख तरुण सैनिक सन १९१६च्या दरम्यान बेल्जियम येथे पाठविले. त्यात अपशिंगे गावातील २७६ सैनिक सहभागी झाले होते. दरम्यान, पाहिल्या घनघोर महायुद्धात गावातील ४६ जवान शहीद झाले. याच जवानांच्या स्मरणार्थ गावाच्या मध्यभागी स्मृतिचिन्ह म्हणून शहीद स्मारक बांधले असून, त्याचे लोकार्पण १९४५ला इंग्रज गवर्नर यांनी स्वतः येऊन केले. आज हे शहीद स्मारक गावातील तरुणांना स्फूर्ती देत असून, देशसेवेसाठी गावातील ४०० पेक्षा जास्त सैनिक देश सेवा बजावित आहे.

Web Title: ‘Veer Jawan born here’, Gharaganis serving in the army is the greatest village in satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.