पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब... दरवाढीने ग्राहकांची बोंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:11 PM2017-10-03T17:11:37+5:302017-10-03T17:18:14+5:30
गत सप्ताहात पावसाने झोडपून काढल्याने कोथिंबीर, पालक आणि मेथी शेतात पाणी भरल्याने कुजल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसत आहे. या दिवसांत मुबलक असणाºया या पालेभाज्यांनी पन्नाशी गाठली आहे. पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब झाल्या तर दरवाढीने ग्राहकांची मात्र बोंब झाली.
सातारा, दि. ३ : गत सप्ताहात पावसाने झोडपून काढल्याने कोथिंबीर, पालक आणि मेथी शेतात पाणी भरल्याने कुजल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसत आहे. या दिवसांत मुबलक असणाºया या पालेभाज्यांनी पन्नाशी गाठली आहे. पावसाच्या पाण्याने पालेभाज्या चिंब झाल्या तर दरवाढीने ग्राहकांची मात्र बोंब झाली.
दसरा, दिवाळीत साताºयाच्या बाजारपेठेत कोथिंबीर, मेथी आणि पालक या पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. अंतरपीक म्हणून या तिन्ही भाज्या घेण्याकडे शेतकºयांचा कल असतो. शहर व परिसरातील शेतकरी या पालेभाज्या घेऊन शहरात विक्रीस आणतात. पण पितृपक्ष पंधरवड्यानंतर सलग लागून राहिलेल्या पावसात या भाज्या चांगल्या उगवून आल्या. त्यानंतर नवरात्रीत तिसºया माळेपर्यंत धो-धो कोसळणाºया पावसाने या पिकांचे नुकसान केले.
जमिनीला लागून काही इंचावर असणाºया या भाज्या पावसाचा मार सोसू शकल्या नाहीत. त्यामुळे मातीत पडून आणि पाण्यात बुडून या भाज्या शेतातच कुजल्या. परिणामी दसºयाच्या दरम्यान या भाज्या बाजारपेठेतून गायबच झाल्या होत्या.
रविवारी जिल्ह्याच्या दुसºया टोकापासून प्रवास करून आलेल्या कोथिंबीर, मेथी आणि पालकने मात्र भलताच भाव खालला. दसºया दिवशी आणि रविवारी झक्कास जेवणाचा बेत करण्यासाठी कोथिंबीर आणायला गेलेल्यांना दर ऐकून अंगावर शहारे आले.
सुकलेल्या आणि निस्तेज अशा चार काड्यांचा दर दहा आणि पंधरा रुपये चालला होता. त्यातल्या त्यात बरी पालेभाजी ३० आणि ३५ रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होती. चांगल्या दर्जाची पालेभाजी मात्र पन्नासच्या खाली कोणीही द्यायला तयार नव्हते.
लसणी मेथी, पालक पनीर... सध्या नाहीच!
साताºयात मेथीची भाजी विविध पद्धतीने खाणारे खवय्ये आहेत. शहर व परिसरातील हॉटेलमध्ये लसणी मेथी, मेथीचं पिठलं, पालक पनीर यांसारखे पदार्थ खाण्यास पसंती दिली जाते. बाजारपेठेतील या दरवाढीमुळे काही हॉटेल व्यावसायिकांनी हे पदार्थ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मसाला पापड, व्हेज मंजुरियन सारख्या पदार्थांवर कोथिंबीरची जागा बारीक चिरलेल्या कोबीने घेतल्याचे पाहायला मिळते.
मंडईतील पालेभाज्यांचे दर चांगलेच वधारले आहेत. त्यामुळे जेवणात सुकी भाजी म्हणून आता कडधान्यांच्या उसळी आणि सॅलेडवर सध्या भर दिला आहे. त्याबरोबरचं लोणचं आणि चटणीचा आधार आहे.
- चंद्रकांत कुलकर्णी, सातारा.