भाजी झाली राजी; फळांची मात्र नाराजी
By admin | Published: October 27, 2014 09:14 PM2014-10-27T21:14:55+5:302014-10-27T23:45:27+5:30
राजवाडा मंडई : रस्त्यावरच ठाण मांडून बसण्याची जुनी सवय मोडण्यावर पालिकेचा भर; फळविक्रेत्यांची मात्र चुळबूळ
सातारा : राजवाडा परिसरात पादचारी मार्गांवर अतिक्रमण करून फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या स्थलांतराचा विषय ऐरणीवर आला आहे. याच परिसरात उभारलेल्या फू्रट मार्केटमध्ये त्यांना कट्टे देण्यात येणार आहेत. मात्र, हे मार्केट दुसऱ्या मजल्यावर असल्याने त्या ठिकाणी व्यवसाय होणार कसा? असा प्रश्न या विक्रेत्यांनी उपस्थित केला असल्याने भाजी झाली राजी; मात्र फळांची नाराजी!, असे चित्र निर्माण झाले आहे.
राजवाड्यापासून कमानी हौदापर्यंतच्या फळविक्रेत्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्याच्या हेतूने राजवाड्यावर प्रतापसिंह महाराज भाजी मंडई व फ्रूट मार्केटची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन होऊन बराच कालावधी उलटला तरी भाजी व फळविक्रेत्यांना कट्टे वाटप झालेले नव्हते. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर आज (मंगळवारी) भाजी विक्रेत्यांना कट्टे वाटप करण्यात येणार आहेत. त्याबाबतची सोडत काढण्यात येणार आहे. याठिकाणी १२३ भाजी विक्रेत्यांची सोय होणार आहे.
दरम्यान, फळविक्रेत्यांना या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जागा देण्यात येणार आहे. सध्या राजवाड्यासमोरील फूटपाथ तसेच कमानी हौदापर्यंत जागा मिळेल, त्या ठिकाणी बसून फळविक्री केली जाते. पादचारी मार्गाचा वापर यासाठी होत असल्याने पादचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
या परिस्थितीमध्ये फळविक्रेत्यांचेही नव्या इमारतीत स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, फळविक्रेत्यांना दुसऱ्या मजल्यावर जागा दिली जाणार असल्याने ४0 पायऱ्या चढून फळ खरेदीला कोण येणार?, असा प्रश्न या विक्रेत्यांना भेडसावत आहे. भाजी विक्रेत्यांच्या कट्ट्यांमधील काही कट्टे फळविक्रेत्यांना दिल्यास व्यवसाय होऊ शकेल, असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्याऐवजी दुसरी सोयीची जागा पालिकेने उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावरील विक्री बंद करण्यात येईल, असे फळविक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे. फळ विक्रीच्या कट्ट्यांची रुंदीही कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मालाची ने-आण करतानाही गैरसोय होणार आहे, असे फळविक्रेते सांगतात.
फळविक्रीसाठी फूटपाथ हायजॅक झाल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यांवरुन चालावे लागते. याच रस्त्यातून वाहनांचीही ये-जा सुरु असते. त्यामुळे कोंडीत भर पडते. पालिका प्रशासन याबाबत काय निर्णय घेते? याची उत्सुकता
आहे. (प्रतिनिधी)
जनावराचा दवाखाना व पार्किंग, सदाशिव पेठेतील जुन्या किंवा नव्या भाजी मंडईत फळविक्रेत्यांची सोय करावी, अशी मागणी आहे.
फूटपाथवरील फळविक्रेत्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर आहे.
जिथे चौपाटी तिथे फळविक्रेत्यांना जागा देण्याची मागणी केली जात आहे.
फ्रूट मार्केट बांधले असल्याने प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचीच शक्यता दाट आहे.
रस्त्यावर होईल तेवढा व्यवसाय चांगला होणार आहे. वादाचा कुठलाच मुद्दा नाही. माल दहा डाग आला तर ओझं ४0 पायऱ्या चढून न्यायला लागतं. ग्राहक दहा रुपयांची केळी न्यायला कोण येणार नाही. याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. पूर्ण देशात अशी मंडई कुठेच नाही.
- अस्लम बागवान, फळविक्रेता