पुसेगावातील भाजी मंडई कोरोनामुळे गावच्या बाहेर जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:46+5:302021-04-14T04:35:46+5:30

पुसेगाव : पुसेगाव व परिसरातील गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड सुरक्षा ग्रामस्तरीय समितीची सोमवारी तातडीची बैठक घेण्यात ...

The vegetable market in Pusegaon will go out of the village due to corona | पुसेगावातील भाजी मंडई कोरोनामुळे गावच्या बाहेर जाणार

पुसेगावातील भाजी मंडई कोरोनामुळे गावच्या बाहेर जाणार

Next

पुसेगाव : पुसेगाव व परिसरातील गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड सुरक्षा ग्रामस्तरीय समितीची सोमवारी तातडीची बैठक घेण्यात आली. गावात मध्यभागी असलेली भाजीमंडई बुध रोडनजीक असलेल्या नवीन एसटी स्टँडच्या मोकळ्या जागेत हलविण्याचा तसेच इतर गावातील भाजी विक्रेत्यांना पुसेगावात भाजीपाला विक्रीसाठी बंदी व संपूर्ण गावातील कोविड लसीकरणासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला समितीचे अध्यक्ष सरपंच विजय मसणे, सहअध्यक्ष गणेश बोबडे,उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे, मंडलाधिकारी तोडरमल, ग्रामपंचायत सदस्य व या समितीत कार्यरत असलेले सर्व सभासद उपस्थित होते.

शासनाच्या आदेशानुसार सध्या पुसेगावात अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. गेले कित्येक आठवडे रविवारचा आठवडा बाजारही भरला नाही. मात्र, पुसेगावात मध्यभागीच असलेल्या भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी लोकांची नेहमीच गर्दी होत आहे. तसेच या भाजी मंडईच्या भोवताली पोलीस ठाणे, ग्रामपंचायत तसेच तलाठी मंडलाधिकारी यांचे कार्यालय, बँका, सोसायटी व पोस्ट अशी कार्यालये आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही भाजी मंडई लोकवस्तीपासून दूर बुध रोडनजीक असलेल्या नवीन एसटी स्टँडच्या जागेत हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तलाठी गणेश बोबडे यांनी सांगितले. तसेच पुसेगावातील सर्व भाजीपाला दुकानदारांनी तसेच फळ विक्रेत्यांनी गावातील चारही रस्त्यांच्या कडेला कुठेही बसू नये अशा सूचना देण्यात याव्यात. तसेच पुसेगाव व्यतिरिक्त इतर ठिकाणांहून कोणीही पुसेगावात भाजीपाला विक्रीसाठी आणू नये. तसे आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर व भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सद्यस्थितीत काही मोजकीच दुकाने (अत्यावश्यक सेवेतील) सुरू आहेत. याच दुकानात ग्राहकांची ये-जा होत आहे. त्यामुळे हेच दुकानदार, भाजीपाला व्यावसायिक कोरोना स्प्रेडर ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन या सर्व व्यापारी, भाजीपाला विक्रेते व दुकानदारांच्या कोरोना चाचण्या पुढच्या बुधवारपर्यंत(दि. २१)कराव्यात अशी सूचना यावेळी करण्यात आली. जे कोरोना चाचणी करणार नाहीत त्यांना आपला व्यवसाय सुरू करता येणार नाही असा इशारा यावेळी समितीच्यावतीने देण्यात आला.

Web Title: The vegetable market in Pusegaon will go out of the village due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.