भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळेना; बळीराजा हतबल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:38 AM2021-04-21T04:38:18+5:302021-04-21T04:38:18+5:30
कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही ...
कऱ्हाड : कोरोनाच्या महामारी संकटामुळे सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. भाजीपाला बाजारही बंद आहेत. त्यामुळे कऱ्हाडच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळतात. येथे विक्रीला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला समाधानकारक दर मिळत नाही. त्यामुळे बळीराजा हतबल झालेला पाहायला मिळतोय.
कऱ्हाडची बाजारपेठ ही सर्वच दृष्टीने मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भाजीपाल्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. सातारा, सांगली जिल्ह्यासह कोकणातील व्यापारी इथला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाला समाधानकारक दर मिळेना. परिणामी शेतकरी हैराण झाला आहे.
सातारा जिल्ह्यातही शहरातील भाजी मंडई बंद आहेत. भाजीपाला फक्त फिरून विक्रीला परवानगी दिली आहे. त्यालाही वेळेचे बंधन घातले आहे. त्याचबरोबर गावोगावचे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे उत्पादन केलेला माल घ्यायला व्यापारी उत्सुक नाहीत. मला खरेदी केला तर तो विकायचा कुठे? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. या साऱ्याचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे.
दरम्यान दर चांगला मिळत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचा तोडाच केलेला नाही. किंवा मला काढलेला नाही. व्यापाऱ्यांना फोन करून मला घेऊन येऊ का? असे विचारले असता, मालाला ग्राहक नाही; चांगला दर मिळत नाही. असे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पिकवलेल्या या मालाचं करायचं काय या विचाराने शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे.
चौकट
मंगळवारचे होलसेल दर किलोमध्ये
वांगी -५ ते ७ रुपये
टोमॅटो- ८ ते १० रुपये
भेंडी- २५ ते ३० रुपये
कारले- २० ते २५ रुपये
फ्लावर- ५ ते ८ रुपये
कोबी- २ ते ३ रुपये
गवारी - १८ ते २५ रुपये
ढोबळी मिरची- १५ ते १८ रुपये
काकडी- १५ ते २० रुपये
कांदा- ५ ते १३ रुपये
बटाटा - १० ते १८ रुपये
लसूण- ५५ ते ७५ रुपये
हिरवी मिरची- १५ ते २० रुपये
कोट
कोरोनामुळे बाजारपेठ बंद आहे. याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाला आहे. कऱ्हाडच्या बाजारपेठेत कोकणातील व्यापारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. मात्र ३० एप्रिलपर्यंत तेथील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे मालाला उठाव नाही. जो माल विक्री केला जातो त्याला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे .
सोमनाथ कुमठेकर
व्यापारी ,कऱ्हाड
फोटो: कऱ्हाड येथे बाजार समितीच्या आवारातील भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.