६ महिने.. ७ गुंठे.. अन् ५० हजारांचे उत्पन्न; सातारा जिल्हा कारागृहातील मोकळ्या जागेत पिकवल्या भाज्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 05:39 PM2023-04-24T17:39:13+5:302023-04-24T17:39:45+5:30

बंदीवानांच्या सेंद्रिय भाजीला मागणी

Vegetables grown in open space of Satara District Jail | ६ महिने.. ७ गुंठे.. अन् ५० हजारांचे उत्पन्न; सातारा जिल्हा कारागृहातील मोकळ्या जागेत पिकवल्या भाज्या

६ महिने.. ७ गुंठे.. अन् ५० हजारांचे उत्पन्न; सातारा जिल्हा कारागृहातील मोकळ्या जागेत पिकवल्या भाज्या

googlenewsNext

प्रगती जाधव-पाटील

सातारा : विविध गुन्ह्यांतर्गत सातारा जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या कैद्यांनी अवघ्या सहा महिन्यांत कारागृह परिसरात असलेल्या ७ गुंठे जागेत भाजीपाला पिकवला. बंदीवानांच्या कष्टातून फुललेल्या या भाज्यांनी कारागृहाला तब्बल पन्नास हजार ६४ रूपये कमवून दिले हे विशेष. कैद्यांनी त्यांच्या कष्टातून फुलवलेल्या या भाजीचा वापर त्यांनाच खाण्यासाठी केला गेल्याने कारागृहात स्व:कष्टाने पिकवून खाण्याचा आनंद देखील कैद्यांनी उपभोगला आहे.

जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यांंतर्गत कैद्यांना ठेवण्याची क्षमता १६८ आहे. आजमितीस सातारा कारागृहात ३७० कैदी म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त आहेत. कारागृहातील पडीक जागेचा योग्य वापर व्हावा यासाठी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी येथे भाजीपाला लावण्याची संकल्पना मांडली. किरकोळ गुन्ह्यातील ज्या कैद्यांना आवडेल त्यांनीच येथे काम करावे असेही स्पष्ट केले.

दिवसभर बराकमध्ये बसण्यापेक्षा निर्मितीचा आनंद घेता यावा या उद्देशाने पहिले काही दिवस हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच बंदी तयार झाले. वाफे करण्यापासून बियांची लागण करेपर्यंत सगळेच या प्रयोगाकडे तटस्थपणे बघत होते. पण रोपे वाढू लागली तसतशी या वाफ्यांमध्ये काम करण्याची तयारी बंदींनी दाखवली. सगळ्यांच्या सहाय्याने ही बाग फुलत गेली. यामध्ये कैद्यांची सुरक्षा पाहून काम करणे महत्त्वाचे होते. त्यामुळे सुरक्षेची जबाबदारी वरिष्ठ तुरूंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, शेती अधिकारी व तुरुंग अधिकारी राजेंद्र भापकर यांनीही मोलाचे काम केले.

बंदीवानांच्या सेंद्रिय भाजीला मागणी

कारागृहात उपलब्ध जागांमध्ये सहा महिन्यांतील ब्रोकोली, पर्पल कॅबेज, ग्रीन कॅबेज, फ्लाॅवर, वांगी, मुळा, पालक, डांगर भोपळा, दुधी भोपळा, हिरवी मिरची, पावटा, दोडका, कारले भाज्यांचे उत्पादन घेतले. कोणत्याही रसायनांचा वापर न करता पिकवलेली ही भाजी कारागृहातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विकत न्यायला पसंती दिली.


कारागृहाची क्षमता किती
पुरुष महिला

१५९ - ९ = १६८
कोणत्या गुन्ह्यातील किती बंदीवान
पुरुष महिला
खून साधारण 100
मारामारी, दरोडा, चोरी साधारण 70
बलात्कार साधारण 65
इतर गुन्ह्यातील साधारण 135

बंदीवानांचे शिक्षण किती - नववी, दहावी, बारावी, पदवीधर, अभियंत्रा, एमबीए, डाॅक्टर, अकाैंटंट
कारागृहात होणारी आरोग्य शिबिरे
जिल्हा कारागृहात गुप्तरोग, नेत्र तपासणी, कावीळ, त्वचारोग, दंतरोग, चष्मा वाटप, नाक-कान-घसा तपासणी, मानसोपचार.
प्रशिक्षण/कोर्स
कारागृहातील कैद्यांकडे असलेल्या वेळेचा सुयोग्य वापर करण्यासाठी कारागृहातच त्यांच्यासाठी कॉम्प्युटर अकाउंटिंग व ऑफिस असिस्टंट, मोटर रिवाइंडिंग, भाजीपाला लागवड, कंदील बनविणे, फाईल बनविणे, एन्व्हलप बनविणे, पेपर बॅग बनविणे आदी प्रशिक्षणे दिली जातात. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ - सहा महिन्यातील एकूण उत्पन्न ५० हजार ६४ रूपये


कारागृहात आलेल्या अनेक कैद्यांना आपल्या कृतीचा पश्चाताप झालेला असतो. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी केली जाते. प्रत्येक कैद्याला त्याच्या आवडीनुसार छंद जोपासण्याबरोबरच नवनिर्मितीचा आनंद घेण्याच्या उद्देशाने शेतीचा प्रयोग राबविला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. - शामकांत शेडगे, कारागृह अधीक्षक
 

Web Title: Vegetables grown in open space of Satara District Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.