सासऱ्यासह मेव्हण्याने घातली जावयाच्या अंगावर गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 02:02 PM2019-10-12T14:02:23+5:302019-10-12T14:06:54+5:30
मुलीला सतत त्रास देत असल्याचा आरोप करत सुमित सुरेश तपासे (वय ३०, रा. मल्हार पेठ, सातारा) यांना सासऱ्यासह मेव्हण्याने अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
सातारा : मुलीला सतत त्रास देत असल्याचा आरोप करत सुमित सुरेश तपासे (वय ३०, रा. मल्हार पेठ, सातारा) यांना सासऱ्यासह मेव्हण्याने अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
याप्रकरणी मेव्हणा सुशांत मच्छीद्रनाथ शिंदे व सासरे मच्छिंद्रनाथ प्रल्हाद शिंदे (रा. सदर बझार सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तपासे आणि शिंदे कुंटुंबामध्ये मतभेद आहेत. दि. ९ रोजी हॉटेल राधिका पॅलेससमोरून सुमित तपासे हे चालत निघाले होते. त्यावेळी तेथून सासरे मच्छिंद्रनाथ शिंदे आणि मेव्हणा सुशांत शिंदे हे चारचाकीतून जात होते.
यावेळी सुशांत हा गाडी चालवत होता. एकमेकांकडे खुन्नसने पाहात सुमित तपासे यांच्या अंगावर त्याने गाडी घातली. यावेळी ते खाली पडले. पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घालण्यात आली. परंतु त्यांनी उडी मारल्याने ते वाचले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी भेट दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.