वाहनधारकांची कसरत थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:39+5:302021-07-05T04:24:39+5:30
कसरत थांबेना मेढा : सातारा-मेढा-महाबळेश्वर या मार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. ठिकठिकाणी रस्ता ...
कसरत थांबेना
मेढा : सातारा-मेढा-महाबळेश्वर या मार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदण्यात आल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने केळघर घाटातून रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोक्याचे ठरू लागले आहे. संबंधित विभागाने रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावून, वाहनधारकांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे.
सदरबझार परिसरात
डुकरांचा सुळसुळाट
सातारा : शहरातील सदरबझार, माची पेठ परिसरात डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकाट डुकरांच्या उपद्रवाबाबत नागरिकांनी पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, पालिकेकडून ही बाब काही गांभीर्याने घेतली जात नाही. त्यामुळे डुकरांचा उपद्रव वाढतच चालला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे. पालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
घाटातील संरक्षक
कठड्यांची दुरवस्था
सातारा : सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातील संरक्षक कठड्यांची ठिकठिकाणी पडझड झाली आहे. तसेच काही ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी या घाटात पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच रस्ताही मोठ्या प्रमाणात खचला. अशा परिस्थितीत संरक्षक कठड्यांची पडझड झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. बांधकाम विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.