‘फॅन्सी’ नंबरप्लेटची वाहने ‘रडार’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:46+5:302021-05-30T04:29:46+5:30

कऱ्हाड : प्रत्येक वाहनाला ‘आरटीओ’चा नोंदणी क्रमांक असतोच, पण सध्या आकड्यांची मोडतोड करून बनविलेल्या फॅन्सी प्लेट वाहनावर लटकताना ...

Vehicles with 'fancy' number plates on 'radar'! | ‘फॅन्सी’ नंबरप्लेटची वाहने ‘रडार’वर!

‘फॅन्सी’ नंबरप्लेटची वाहने ‘रडार’वर!

Next

कऱ्हाड : प्रत्येक वाहनाला ‘आरटीओ’चा नोंदणी क्रमांक असतोच, पण सध्या आकड्यांची मोडतोड करून बनविलेल्या फॅन्सी प्लेट वाहनावर लटकताना दिसत आहेत. या प्लेट आणि अशी वाहने सध्या पोलिसांच्या रडारवर असून, पोलीस, महाराष्ट्र शासन लिहिलेल्या खासगी वाहनांवरही पोलीस कारवाई करीत आहेत.

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने गत काही दिवसांपासून फॅन्सी आणि खराब नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गत वर्षभराचा विचार करता, अशा प्रकारची कारवाई झालेल्या वाहनांची संख्या पाच हजारांपेक्षाही जास्त आहे. त्यावरून वाहनधारक नंबरप्लेटबाबत जागरूक नसल्याचे दिसून येते. शहरातील रस्त्यावरून सध्या नंबरप्लेट खराब अथवा फॅन्सी असणारी शेकडो वाहने धावताना दिसतात.

काही वाहनांच्या प्लेटवरील नंबरचा रंग उडालेला असतो, तर काही वाहनांची प्लेट निम्म्यातून मोडलेली असते. काही जण तर विनानंबरची वाहने बिनदिक्कतपणे दामटताना दिसतात. अशा वाहनधारकास वाहतूक पोलिसांनी अडविले, तर त्वरित नंबर टाकून घेण्याचे तो मान्य करतो. मात्र, त्यानंतरही अनेक जण नंबर टाकून घेण्याची तसदी घेत नाहीत. त्याबरोबरच वाहनाच्या काचेसमोर ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेली पाटी ठेऊन अनेक वाहनधारक रुबाब करताना दिसतात. मात्र, सध्या अशी पाटी असलेल्या वाहनांवरही पोलिसांचा ‘वॉच’ आहे.

- चौकट

प्लेट शंभरची; दंड भरतात हजार

कोणत्याही वाहनासोबत नंबरप्लेट मिळतेच. त्या प्लेटवर फक्त नंबर टाकण्याचा खर्च वाहनधारकाला करावा लागतो. हा खर्चही शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत असतो. मात्र, अनेक वाहनधारक फॅन्सी प्लेट बनवितात आणि त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.

- चौकट (फोटो : २९केआरडी०६)

आडनाव, पडनावाची जुळणी

दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनधारकांमधील ‘फॅन्सी’ नंबरप्लेटची ‘क्रेझ’ सध्या भलतीच वाढली आहे. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांपैकी अनेक वाहनांच्या नंबरप्लेटवर आकड्यांच्या माध्यमातून शब्द तयार करण्यात आल्याचे दिसून येते, हे शब्द तयार करतानाही दादा, मामा, भाऊ, तात्या, आबा, बाबा अशी पडनावे किंवा पाटील, पवार अशी आडनावे साकारली जातात.

- चौकट

नंबरप्लेटसाठी नियम

१) प्रवासी, मालवाहतूक वाहनांसाठी पिवळ्या प्लेटवर काळ्या रंगात क्रमांक.

२) दुचाकीसह खासगी वाहनांना पांढऱ्या प्लेटवर काळ्या रंगात क्रमांक.

३) प्लेटचा आकार, रुंदीसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहेत.

४) नंबर, त्याची उंची, रुंदी व दोन आकड्यांमधील अंतरासाठीही नियम आहे.

(केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार)

- चौकट

१ मार्च, २०२० ते ३१ मार्च, २०२१ अखेर...

कारवाई : ५,०७४

दंड : १०,५९,६०० रु.

- कोट

वाहनांच्या कागदपत्राबरोबरच नंबरप्लेटबाबतही प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. आरटीओकडून मिळालेला नोंदणी क्रमांक वाहनाच्या प्लेटवर स्वच्छ आणि ठळक आकड्यांत असणे आवश्यक आहे. नंबरप्लेटसाठी असणारे नियमही वाहनधारकांनी पाळले पाहिजेत. खराब, तसेच फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या वाहनांवर यापुढेही कारवाई सुरूच राहील.

- सरोजिनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक

वाहतूक शाखा, कऱ्हाड शहर

फोटो : २९केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाडच्या वाहतूक शाखेतील कर्मचारी मनोज शिंदे यांनी खासगी वाहनांतील ‘पोलीस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेल्या पाट्या जप्त केल्या आहेत.

Web Title: Vehicles with 'fancy' number plates on 'radar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.