झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांना की वाहनांना ?
By Admin | Published: February 10, 2015 09:36 PM2015-02-10T21:36:28+5:302015-02-10T23:58:48+5:30
सुरक्षितता धोक्यात : चौकाचौकात नियमांचे उल्लंघन..!
सातारा : वाहतुकीच्या गर्दीतून पादचाऱ्यांनाही सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करतात हे क्रॉसिंग शक्यतो वाहतूक सिंग्नल चौकात असतात; परंतु नेहमीच सिग्नल ठिकाणी वाहनेच या क्रॉसिंगवर उभे राहतात. त्यामुळे झेब्रा क्रॉसिंग मार्ग हा पादचाऱ्यांना की वाहनांना असा प्रश्न पडत आहे. तर दुसरीकडे भर चौकातच वाहनधारक नियमांचे उल्लंघन करत असून देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही.वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणाने पाळणे बंधनकारक आहे. जो कोणी याचे उल्लंघन करेल त्याला दंडात्मक शिक्षा वाहतूक पोलिसांकडून केली जाते. त्याचाच हा भाग आहे की झेब्रा क्रॉसिंग फक्त पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असतो. सिग्नल लागताच पादचारी या मार्गाचा वापर करतात; परंतु शहरातील काही चौकात झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने थांबतात. त्यामुळे पादचारी रस्ता कसा ओलांडणार, हा प्रश्न आहे.दरम्यान, सातारा शहरात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना आता रस्त्यावरूनही चालणे अवघड झाले आहे. पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधली आहे. परंतु फुटपाथवर विक्रेते, जाहिरातीचे फलक, अतिक्रमण व वाहनांची पार्किंग यांचेच अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेसमोर नव्याने सुरू झालेली सिग्नलयंत्रणा खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी शाळा व विविध शासकीय कार्यालय व हॉस्पिटल आहेत. त्यामुळे सतत पादचाऱ्यांची वर्दळही येथे असते. यासाठी पादचाऱ्यांच्या सोयीसाठी येथे झेब्रा क्रॉसिंगची सोय केली आहे. परंतु याच क्रॉसिंगवर वाहने थांबतात. त्यामुळे पादचाऱ्यांना नेमका रस्ता कसा पास करावा, असा प्रश्न आहे. वाहतूक पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने एक प्रकारे वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनधारकांवर कारवाई का होत नाही, अशी विचारणा पादचाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
जागृती आवश्यक
वाहतुकीच्या नियमांविषयी अद्यापही वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये पुरेशी जागरूकता नसल्याचे चित्र दिसते. म्हणूनच झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे गाडी किती लावायची आणि पादचाऱ्यांसाठी किती जागा ठेवायची याविषयी माहिती देवून जागृती होणे आवश्यक असल्याचे चित्र दिसते.
नगरपालिका व वाहतूक शाखेने पादचाऱ्यांसाठी निर्माण केलेले फुटपाथ व झेब्रा क्रॉसिंग रिकामे करून द्यावे. वाहतुकीच्या वर्दळीत पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नियमाचेच पालन पालिका व पोलिसांनी करावे.
- गणेश भोसले,
सदर बझार, सातारा