महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला!, सांडव्यावरून वाहू लागले पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 05:39 PM2022-07-09T17:39:19+5:302022-07-09T17:39:59+5:30
याच वेण्णालेकमधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले.
महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १३५५.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर चोवीस तासांत १५० मिलिमीटर पावसाची नोद करण्यात आली. महाबळेश्वर शहर व परिसरात जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनच पावसाने झोडपून काढले.
आठ ते दहा दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तमाम महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याच वेण्णालेकमधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.