मोठ्या ग्रामपंचायतीत आता गांडूळ खतनिर्मिती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:02 AM2017-09-14T00:02:57+5:302017-09-14T00:02:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये घनकचरा व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी कºहाड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या प्रकल्पाची पाहणी केली. अशाच पद्धतीने जिल्ह्यात इतरही गावांमध्ये एक वेगळा प्रयोग करण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.
बनवडी ग्रामपंचायतीने अत्यंत नेटके नियोजन करून घनकचरा निर्मिती व गांडूळ खत निर्मितीचा मोठा प्रकल्प सुरू केला आहे. या ग्रामपंचायतीतर्फे रोज घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून तो कचरा प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. ग्रामपंचायतीतर्फे याबदल्यात ग्रामस्थांकडून स्वच्छता कर घेते. या करातूनच कचरा वाहून आणून त्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाचा खर्च भागवला जातो.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी बुधवारी बनवडी गावाला भेट दिली. कºहाड पंचायत समितीमध्ये कामाचा आढावाही घेतला. बनवडी गावातील प्रकल्पाची पाहणी करत असताना डॉ. शिंदे यांनी बनवडी ग्रामस्थांच्या वेगळ्या प्रयोगाचे कौतुक केले. तसेच असा प्रकल्प ही काळाची गरज असल्याचे सांगितले. स्वच्छतेसाठी शासन आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच गावे स्वच्छ करण्याचा संकल्पच डॉ. शिंदे यांनी या ठिकाणी सोडला.
बनवडीतील गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामध्ये ग्रामपंचायतीने पॅकिंग व्यवस्था केली आहे. या खताला शेतकºयांची मोठी मागणी आहे. कºहाड तालुक्यातील अनेक गावांनी खताची मागणी केली आहे. साहजिकच शेतकºयांची गरज पाहता खत निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याने इतर गावांनीही पुढाकार घेतल्यास घनकचरा निर्मूलन व गांडूळ खत निर्मिती ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य केली जाऊ शकतात.
सध्या शहरांसह ग्रामीण भागांमध्येही घनकचºयाचा प्रश्न डोके वर काढणारा ठरला आहे. भविष्यामध्ये घनकचºयाची समस्या गंभीर रूप धारण करू शकते.
बनवडी गावच्या २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना व ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. त्याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पाटील, उपअभियंता आरळेकर, शंकरराव खापे, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य उपस्थित होते.
१० रुपये किलोने विकणार खत
बनवडी ग्रामपंचायतीने राबविलेला प्रयोग ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पाडणारा आहे. गांडूळ खत प्रतिकिलो १० रुपये दराने विकले जाते. शेतीच्या सुपीकतेसाठी हे खत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने शेतकºयांचीही खताला मागणी आहे. खत विकून ग्रामपंचायतीला हे आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याने गावांच्या विकासासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो.