गावोगावच्या मतदानात दाटून आला उत्साह!
By admin | Published: August 4, 2015 11:20 PM2015-08-04T23:20:39+5:302015-08-04T23:20:39+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत; गुरुवारी मतमोजणी; आता निकालाकडे लक्ष
सातारा : सातारा जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. जिल्हा प्रशासनाकडे रात्री उशीरापर्यंत मतदानाची एकूण आकडेवारी प्राप्त झाली नाही तरीही सरासरी ८४ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. या निवडणुकीत मतदारांचा उदंड उत्साह दिसून आला. मतदाराजाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी गावोगावी पॅनेलतर्फे वाहनांची व्यवस्था केली होती. बुधवारी ढगाळ वातावरण होते. पण पावसाने हजेरी लावली नसल्याने मतदारांनी रांगा लावून मतदान केले. अनेक गावांमध्ये आमदार, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, सहकाराच्या राजकारणातील मातब्बर मंडळींनी ठिय्या मारला होता. संवेदनशील गावांमध्ये राजकीय मंडळी विशेष दक्षता घेत होते.
खंडाळ्यात ७४८ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी आज चुरशीने मतदान झाले. तालुक्यातील ६६५६३ मतदारांपैकी ५७, ८५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खंडाळा तालुक्यात सरासरी ८७ टक्के मतदान झाले असून ७४८ उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली.खंडाळा तालुक्यात एकूण ५५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. सकाळपासूनच प्रत्येक गावातून मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. तालुक्यातील ३१, ८७० स्त्रीयांपैकी २७, ६८३ स्त्रीयांनी मतदान केले. तर ३४,६९३ पुरूष मतदारांपैकी ३०, १६९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यातील खंडाळा, बावडा, अंदोरी, नायगाव, अहिरे, शिंदेवाडी, विंग, पिंपरे बुद्रुक, कोपर्डे, भादे, पारगाव, सांगवी या गावांमध्ये मोठ्या चुरशीने मतदान झाले. यामध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपैकी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शारदा जाधव, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सुनिती धायगुडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश शिंदे, महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे यांसह अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.४९ ग्रामपंचायतींसाठी सर्वत्र चुरशीने मतदान झाले असले तरी कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शेवटपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरीकांचाही मोठा प्रतिसाद होता.सर्व मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तर संवेदनशील गावांमध्ये अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारपर्यंत सर्वच गावांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले त्यामुळे केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी लगबग होती. वयोवृद्ध मतदारांना गाडीवरून आणले जात होते.