स्टंटबाजीच्या थराराने ग्रेड सेपरेटरमध्ये थरकाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:44+5:302021-02-15T04:34:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : स्टंटबाजांच्या थराराच्या गुंजने ग्रेड सेपरेटर अक्षरश: हादरून जात असून, गत काही दिवसांपासून ग्रेड सेपरेटरमध्ये ...

Vibration in the grade separator by the vibration of the stunt | स्टंटबाजीच्या थराराने ग्रेड सेपरेटरमध्ये थरकाप

स्टंटबाजीच्या थराराने ग्रेड सेपरेटरमध्ये थरकाप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : स्टंटबाजांच्या थराराच्या गुंजने ग्रेड सेपरेटर अक्षरश: हादरून जात असून, गत काही दिवसांपासून ग्रेड सेपरेटरमध्ये होत असलेल्या स्टंटबाजीमुळे वाहनधारकांचा थरकाप उडत आहे. हे स्टंटबाज स्वत:सोबतच इतरांचाही मृत्यू ओढावून घेत आहेत. पोलिसांनी अशा स्टंटबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

ग्रेड सेपरेटर हा साताऱ्याची शान आहे. या भुयारी मार्गातून सुरूवातीला प्रवास करणे सातारकरांच्या औत्सुक्याचे ठरत होते. अनेकजण काहीही काम नसताना, ग्रेड सेपरेटरचे बांधकाम कसे झाले आहे, हे पाहण्यासाठी जात होते. परंतु आता काही युवक केवळ स्टंटबाजी करण्यासाठी या भुयारी मार्गात जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी युवकांच्या टोळक्यांनी ग्रेड सेपरेटरमध्ये जबरदस्त स्टंटबाजी केली. शेजारून वाहने ये-जा करत होती. तरी या स्टंटबाजांना कसलेही भान नव्हते. एकजण स्टंट करत असताना दुसरा त्याचा फोटो काढत व्हिडीओ चित्रीकरण करत होता. सुमारे अर्धा तास हे स्टंटबाज ग्रेड सेपरेटरमध्ये थरकाप उडवत होते. काही वेळानंतर ते तेथून निघून गेले. हा प्रकार काही लोकांनी पाहिला. मात्र, पोलिसांना याची कल्पना दिली नाही. परंतु सोशल मीडियावर ग्रेड सेपरेटरमधील स्टंटबाजी व्हायरल झाल्यानंतर पोलिसांपर्यंतही हा प्रकार समजला. ज्या युवकाने भुयारी मार्गामध्ये स्टंटबाजीचा फोटो व्हायरल केला आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. फोटोमध्ये गाडीचा नंबर स्पष्ट दिसत नसल्यामुळे पोलिसांनी आता व्हायरल फोटोचा आधार घेत, पेठा-पेठांमध्ये जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. संबंधितांवर कारवाई केल्यानंतर यापासून दुसरे स्टंटबाज धडे घेतील, अशी पोलिसांची भूमिका आहे.

कोट :

ग्रेड सेपरेटरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा शोध सुरू असून, त्याच्यावर नक्कीच कारवाई होणार आहे. अशाप्रकारची स्टंटबाजी खपवून घेतली जाणार नसून, यातून कोणाचीही सुटका होणार नाही.

- विठ्ठल शेलार,

सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा

चौकट :

भुयारी मार्गात सीसीटीव्ही हवेच..

ग्रेड सेपरेटरमध्ये अशाप्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी खरं तर सीसीटीव्हीची गरज आहे. ज्यावेळी या भुयारी मार्गाचे उद्घाटन झाले, त्याचवेळी जर सीसीटीव्ही बसविले असते तर नक्कीच स्टंटबाजांना आळा बसला असता. हे स्टंटबाज स्वत:चा जीव धोक्यात घालून, इतर वाहन चालकांचाही मृत्यू ओढावून घेत आहेत.

Web Title: Vibration in the grade separator by the vibration of the stunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.