पिंपळी कोरोनाच्या विळख्यात; चार दिवसांत दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:40+5:302021-05-14T04:38:40+5:30
पाचगणी : स्वतःमध्ये कोविडची लक्षणे असूनही अंगावर दुखणं काढण्याच्या कोविड स्प्रेडरांच्या बेफिकीर वृत्तीमुळे त्याची बाधा इतरांना होत ...
पाचगणी : स्वतःमध्ये कोविडची लक्षणे असूनही अंगावर दुखणं काढण्याच्या कोविड स्प्रेडरांच्या बेफिकीर वृत्तीमुळे त्याची बाधा इतरांना होत असल्याने आज ग्रामीण भागात कोरोना संसर्ग फैलावतोय; तर कोरोना संसर्गापासून दूर असणारी गावे कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. नुकतेच जावळी तालुक्यातील पिंपळी गावात तब्बल २० कोरोनाबधितांमुळे पूर्ण गाव कोरोना विळख्यात अडकून, चार दिवसांत दोन रुग्ण दगावले असल्याने गावातील निर्बंध स्थानिक प्रशासनाने अधिक कडक केले आहेत.
जावळी तालुक्यातील करहर पंचक्रोशीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विवर व हातगेघर गावे सापडली होती. ही गावे प्रशासनाने राबविलेल्या प्रयत्नाने कोविडमुक्त झाली; तर आता नव्याने तालुक्यात पिंपळी गाव कोविड संसर्गाने बाधित होत आहे. तब्बल २० रुग्ण बाधित आले आहेत. स्थानिक पातळीवर प्रशासन सतर्क झाले असून, आज गाव कँटोन्मेंट झोन म्हणून जाहीर झाले आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांत दोन बाधित दगावले आहेत. यामध्ये पहिला ७५ वर्षीय बाधित ९ मे रोजी उपचारादरम्यान, तर बुधवारी (दि. १२) संध्याकाळी उपचारार्थ घेऊन जात असतानाच ७० वर्षीय वृद्धेची प्राणज्योत गाववेशीवर रुग्णवाहिकेत मालवली. त्यामुळे संपूर्ण गावच हादरून गेले आहे.
याच पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील गल्लीबोळांत जंतुनाशक फवारणी केली असून, गावातील लोकांना गावात विनाकारण फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
चौकट :
आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला.
कोरोनाची साखळी तुटण्याकरिता प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून लक्षणे लपवून न ठेवता उपचारासाठी सहकार्य केल्यास ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग साखळी नक्कीच तुटण्यास मदत होऊन ग्रामीण भाग कोरोनामुक्त होऊ शकतो. कुडाळ उपकेंद्रात अनेक कोविड योद्धे बाधित आल्याने आरोग्य प्रशासनावर अधिकच कामाचा ताण वाढला आहे. तो अतिरिक्त कामाचा व्याप सांभाळत आरोग्यसेवक सोमनाथ पांढरपोटे हे आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने आरोग्य सेवा पुरवीत आहेत.
कोट..
गावातील नागरिकांनी कोविडसदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्वरित प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावीत. त्यामुळे लवकर उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करीत ग्रामपंचायतीच्या प्रशासनास सहकार्य करावे.
-
- सुशीलकुमार नाळे, ग्रामसेवक पिंपळी, ता. जावळी.
१३पाचगणी
पिंपळी (ता. जावळी)येेथे बधितांची संख्या वाढल्याने सतर्क प्रशासनाकडून गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.