नाना पाटील चौकातील अतिक्रमणं घेताहेत वाहनचालकांचा बळी

By Admin | Published: July 8, 2017 01:27 PM2017-07-08T13:27:08+5:302017-07-08T13:27:08+5:30

फलटणकरांतून नाराजी : पोलिस अन पालिका प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका

A victim of driving in encroachment at Nana Patil Chowk | नाना पाटील चौकातील अतिक्रमणं घेताहेत वाहनचालकांचा बळी

नाना पाटील चौकातील अतिक्रमणं घेताहेत वाहनचालकांचा बळी

googlenewsNext


आॅनलाईन लोकमत

फलटण (सातारा), दि. ८ : शहरातील सतत वर्दळीचा आणि मोठा चौक असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकात वाहतुकीचा ताण पडत आहे. या चौकात बुधवारी रात्री एका सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याने हा चौक आणखी किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पालिकेने ठोस भूमीका घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.

फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून चार रस्ते फुटतात. एक पुणे-बारामतीकडे जाणारा. दुसरा पंढरपूरकडे जाणारा. तिसरा दहिवडी-साताराकडे जाणारा तर चौथा शहरात येणारा आहे. चौकात मिळणारे चार रस्ते अन् जवळच असलेले बसस्थानक यामुळे या चौकात चोवीस तास वर्दळ असते. हा परिसर सतत गजबजलेला असतो.

या चौकाच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहने ये-जा करत असून परिसरातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. या चौकाजवळ बँका, शाळा असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या चौकात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. काही वेळेस तासभर चौकाच्या चारी बाजूने वाहतुकीच्या रांगा लागल्या असतात. चौकात वाहतूक पोलिस असले तरी त्यांचा जास्त वेळ परजिल्ह्यातील वाहने अडवून त्यांच्याकडून पैसे घेण्यातच जात असल्याचा आरोप वाहनचालकांमधून होत आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करता या चौकात सातत्याने अपघातांची मालिका वाढलेली आहे. या चौकात गेल्या दोन वर्षांत शेकडो अपघात झालेले आहे. चौकाला अतिक्रमणाचा विळखा आहे तसाच विळखा खड्ड्यांचाही बसलेला आहे. चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच रस्त्याची लेवल नसल्याने अपघात वाढत आहेत.

चौकातच मोठ्या प्रमाणात खासगी वाहतूक करणाऱ्या वडापच्या गाड्या उभ्या असतात. या गाड्यांमुळे काहीवेळेस वाहतुकीस अडथळा येत असूनही वाहतूक पोलिस त्यांना बाजूला सरकविण्याचे धाडस दाखवत नाहीत.

चौक परिसरातून नीरा उजवा कालवा वाहत जात असतो. या कालव्याच्या पुलाची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. या पुलावरही बराचवेळ वाहतूक अडकून पडलेली असते. त्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाबाबत तसेच रस्त्याच्या मजबुतीकरणाकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

या चौकातील वाहतुकीकडे व सोयीसुविधाबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने कित्येकजणांनी येथे जीव गमवला आहे. पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याच्या देखरेखीवरून एकमेकाकडे बोट दाखवित असले तरी दोघांनी मिळून ज्याच्या त्याच्या हद्दीतील प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

सायकलवरून जाणाऱ्या सायकलस्वारास डंपरखाली पडल्याने नाहक जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. या चौकातच शाळा असून, शाळेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कित्येक बळी जाऊनही नगरपालिकेचे प्रशासन आंधळेपणाचे सोंग घेऊन गप्प बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे.


क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अनेक अपघात या चौकात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या चौकातील चारही बाजूंने गतिरोधक तयार केले तर वाहनांचा वेग कमी होऊन अपघात कमी होतील. तसेच चौकातील रस्त्यांचे मजबुतीकरण करून साईडपट्ट्या भरल्या तरी अपघात कमी होतील.

- राजेंद्र भागवत
गोखळी



अपघातांना कारणीभूत घटक



- अतिक्रमणांचा विळखा

- चौकात उभे असलेल्या वडाप गाड्या

- खड्डे अन् असमतल रस्ते

Web Title: A victim of driving in encroachment at Nana Patil Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.