अज्ञात आजार घेतोय जनावरांचे बळी
By admin | Published: February 18, 2015 01:01 AM2015-02-18T01:01:42+5:302015-02-18T01:01:42+5:30
डॉक्टरांना होईना निदान : कुसुंबीमुरा येथे शेतकऱ्यांची १६ जनावरे दगावली
मेढा : कुसुंबीमुरा, ता. जावळी येथे सध्या अज्ञात आजाराने धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात या आजाराने १४ गाई, २ खोंडांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या आजाराचे निदान डॉक्टरांनाही होत नसल्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका वाढला आहे.
कुसुंबीमुरा हे डोगर पठारावरील गाव. या गावात देशी जातीच्या गाई आहेत. दुधाचा व्यवसाय करूनच येथील कुटुंबाचा खर्च चालतो. त्यामुळे शेतकरी जनावरांना जीवापलीकडे सांभाळत आहेत. मात्र, एक महिन्यापासून जनावरे एक मागून एक मृत्युमुखी पडू लागल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. डॉक्टरांनी जनावरांची तपासणी करून उपचार करून या आजारावर नियंत्रण मिळविता आले नाही.
आजपर्यंत गावातील किसन आखाडे यांच्या ४ गाई, रामचंद्र आखाडे १ गाय व १ खोंड, आनंदा आखाडे २ गाई, १ कालवड, ज्ञानेश्वर आखाडे १ गाय, भगवान आखाडे १ गाय, १ खोंड, बाबूराव आखाडे १ गाय, गणपत आखाडे १ गाय आणि शशिकांत आखाडे यांच्या २ दोन गाई या अज्ञात आजाराला बळी पडल्या आहेत. तर दोन जनावरे मृत्यूशी झुंज देत आहेत.
कुसुंबी बिटला असणारे डॉ. माळी व डॉ. बागवान यांनी जनावरांवर उपचार सुरू केले आहेत. यातून ६ जनावरे वाचली आहेत. मात्र, या आजाराचे निदान होत नसल्यामुळे जनावरांसह शेतकऱ्यांचाही जीव टांगणीला लागला आहे. (प्रतिनिधी)