शर्यत बंदी विरोधात बळीराजा रस्त्यावर
By admin | Published: January 22, 2017 11:48 PM2017-01-22T23:48:30+5:302017-01-22T23:48:30+5:30
कऱ्हाडात निदर्शने : बंदी उठवा अन्यथा तीव्र आंदोलन; बैलगाडी चालक-मालक संघटनेचा इशारा
कऱ्हाड : तामिळनाडू येथे जलीकट्टूला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर तेथील सरकारने पुन्हा शर्यती सुरू केल्या. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्यापही शर्यतींना मंजुरी दिलेली नाही. तसेच शर्यतींना ‘पेटा’ संस्था आणि प्राणीमित्र संघटनांची विरोध केल्यामुळे शर्यतींवर घातलेली बंदी राज्य शासनाने तत्काळ उठवावी, तसेच ‘पेटा’ संस्था व प्राणीमित्र संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी करीत कऱ्हाड येथे रविवारी अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनेचे राज्याध्यक्ष धनाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने शर्यतीबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचा शिंदे यांनी यावेळी इशारा दिला.
यावेळी पैलवान आनंदराव मोहिते, उदयसिंह पाटील, प्रकाश आळते, अॅड. जितेंद्र पाटील, युवराज पाटील, बापूराव चव्हाण, गोपीचंद तपासे, राजेंद्र जाधव, संदीप बाबर, हेमंत करांडे, हृषीकेश मोरे आदींसह कऱ्हाड तालुक्यातील बैलगाडी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनाजी शिंदे म्हणाले, ‘तामिळनाडू सरकारने जलीकट्टूच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. मात्र, महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना राज्य शासनाकडून यास प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी शर्यती सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी द्यावी, जेणेकरून तामिळनाडूप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू होतील.
२०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी व जलीकट्टू या बैलांच्या खेळावरील बंदी कायम केली होती. त्यानंतर पुन्हा जानेवारी २०१६ मध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून शिष्टमंडळाने बैलगाड्या चालक, हातगाडीवाले यासह अनेक व्यावसायिकांचा प्रपंच रस्त्यावर आल्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा व बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अशी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे भेट घेत त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून बैलगाडी शर्यती निश्चित सुरू करण्यात येतील, असे केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी सांगितले होते. त्यानुसार केंद्रीयमंत्री जावडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैलगाड्या शर्यती सुरू करण्याबाबत चर्चा केली. चर्चेमधून पंतप्रधान मोदींनी यास परवानगी दिली. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यात पुन्हा बैलगाडी शर्यती सुरू कराव्यात, अशी घोषणा केली. मात्र, त्यावेळी ‘पेटा’ व प्राणीमित्र संघटनेने पुन्हा या निर्णयाला आव्हान दिले. तेव्हा पुन्हा सर्वाेच्च न्यायालयाने शर्यतींना स्थगिती दिली. आता नुकतेच तामिळनाडू येथे झालेल्या आंदोलनानंतर केंद्राने मान्यता दिल्यानंतर तामिळनाडू सरकारने तेथे जलीकट्टू, बैलगाडी शर्यतींना मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारनेही राज्यात बैलगाडी शर्यती सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येतील.’
यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ व दत्ता चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आनंदाराव मोहिते, उदयसिंह पाटील, प्रकाश आळते यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन करण्यापूर्वी संघटनेच्या वतीने शनिवारी प्रशासनास याबाबत निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)