विजय दिवस हा अभिमानास्पद समारोह
By admin | Published: December 16, 2015 12:06 AM2015-12-16T00:06:34+5:302015-12-16T00:06:51+5:30
शिवाजीराव देशमुख : कऱ्हाडला ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात
कऱ्हाड : ‘भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कऱ्हाडला प्रत्येक वर्षी विजय दिवस साजरा केला जातो. संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा हा ‘विजय दिवस’ म्हणून ओळखला जातो. यादिवशी भारतीय सैन्यदलातील तिन्ही दलातील सैनिकांनी देदीप्यमान कामगिरी केली होती, त्याच्याच प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. कऱ्हाडला साजरा केला जाणार विजय दिवस हा देशातल्या प्रत्येक नागरिकाने साजरा केला पाहिजे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले.कऱ्हाड येथे विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आयोजित ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार, शिवाजी विद्यापीठ कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, पद्मश्री चंद्रकांत बोर्डे, मेजर जनरल मुखर्जी, कर्नल संभाजीराव पाटील, पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे, गुलाबराव पोळ, मुख्याधिकारी प्रशांत रोडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माजी सभापती शिवाजीराव देशमुख व मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार यांना ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले. तसेच सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या आई कालिंदी घोरपडे यांना वीरमाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.माजी सभापती देशमुख म्हणाले, ‘देशाच्या त्यागासाठी आपले सर्वस्व प्रदान करणे ही साधी गोष्ट नाही. या देशातील तरुणांना पोलीस हा एकच शब्द माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यात सैन्यदलाच्या कार्याबाबत उर्जा निर्माण करणे गरजेचे आहे. आज देशासाठी प्राण देणारे अनेक वीर आहेत. आज माजी सैनिकांसाठी सरकारने कायदे केले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. सैनिकांना सोयी सुविधा देण्यामध्ये महाराष्ट्राचा खूप खाली क्रमांक लागतो.’
चंद्रकांत बोर्डे म्हणाले, ‘कऱ्हाडकरांचे मैदान हे शौर्यवीरांचे मैदान आहे. अशा शौर्यवीरांना मी अभिवादन करतो. हा पुरस्कार माझ्या जीवनातील एक महत्वाचा असा पुरस्कार आहे.’यावेळी कर्नल संभाजीराव पाटील व कु लगुरु डॉ. देवानंद शिंदे, गुलाबराव पोळ यांनी मनोगत व्यक्त केले.
विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)