Video: 'इथं माझंच मला पडलंय अन् तुम्ही मलाच विचारा, सरकार कुणाचं येणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 12:17 PM2019-11-04T12:17:39+5:302019-11-04T12:23:39+5:30
शेतकर्यांसाठी इर्मा योजना लागू करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे.
सातारा - सध्या राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेत राज्यात सत्ता कोणाची येणार हा प्रश्न चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केलेल्या दिसत नाही. महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढणारे शिवसेना-भाजपा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून युतीच्या तिढ्यावर व्हेट अँन्ड वॉचची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पराभव झालेले उदयनराजे भोसले यांना पत्रकारांनी राज्यात कोणाचं सरकार येईल? असा प्रश्न केला त्यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की, इथं माझचं मला पडलंय, तुम्ही मलाच विचारा कोणाचे सरकार येणार आणि मला काय वाटते? अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. तसेच रामदास आठवले म्हणतायेत ते बरं आहे. युतीचा तिढा सुटेपर्यंत त्यांनाच मुख्यमंत्री करा असंही त्यांनी सांगितले. मात्र थोडी ताणाताणी होईल पण सरकार लवकर स्थापन होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले की, शेतकरी सधन कधी होणार? ज्यावेळी शेतकर्याला इंडस्ट्रिअल स्टेटस द्याल तेव्हा. शेतकर्यांसाठी इर्मा योजना लागू करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. इर्मा योजना लागू केली तर शेतकऱ्यांचं कल्याण होईल. नैसर्गिक आपत्तीबाबत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. इर्मा योजना बाबत महाराष्ट्र राज्याने पुढाकार घेतल्यास इतर राज्यही ही योजना लागू करतील. नॅशनल डिझास्टर टास्क फोर्स माध्यमातून जे नियोजन होईल त्याची माहिती घेऊन यामध्ये मला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करेन असंही त्यांनी सांगितले.
त्याचसोबत लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होईल. प्रत्येकाला खाते वाटपाबाबत अपेक्षा असते, त्यामुळे सत्ता स्थापनेस उशीर होत असावा. दोन्ही पक्षांना सल्ला देण्या इतका मी मोठा नाही, योग्य निर्णय घेतील असंही उदयनराजेंनी सांगितले. यापूर्वीही उदयनराजे यांनी शेतकऱ्यांसदर्भातील मागण्याची पूर्तता झाली नाही तर, शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. बळीराजा आमच्या जीवाभावाचा असल्याने, उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी असंतोषाचे नेतृत्व वेळप्रसंगी आम्हाला करावे लागेल तरी आम्ही करु असा इशाराही सरकारला दिला होता.