Video : दोन महिन्यांपासून शेकडो एसटी जागेवरच; टायरला पडतायत चिरा, 'कोणीही या बसा'चेही प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:02 PM2022-01-25T18:02:31+5:302022-01-25T18:02:47+5:30
संपाच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ दोन महिन्यापासून शेकडो गाड्या एकाच ठिकाणी उभ्या आहेत.
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप करून अडीच महिने होऊन गेले आहेत. जवळजवळ दोन महिन्यापासून शेकडो गाड्या एकाच ठिकाणी उभ्या आहेत. त्यामुळे फार काही फटका बसेल असे वाटत असले तरी गेल्या लॉकडाऊननंतर आलेल्या अनुभवातून दिसत आहे. गाड्यांच्या केवळ बॅटऱ्या डाऊन होणे, चाकातील हवा कमी झाल्याने टायरला चिरा जाणे हे प्रकार घडू शकतात.
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. संपाचा तोडगा सुटत नसल्याने जवळजवळ महिन्यापासून गाड्या बाहेर पडू शकल्या नाहीत. आताच कोठे काही दिवसांपासून लालपरी धावू लागली आहे. पण, अजूनही शेकडो गाड्या बसस्थानकात उभ्या आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी भासण्याचा धोका असतो. पण, तांत्रिक विभागातील कर्मचारी कुशल असल्याने संप मिटल्यानंतर दुसऱ्या बॅटऱ्या जोडून गाड्या सुरू करता येतील. हाच प्रकार गेल्या लॉकडाऊनमध्येही अनुभवास आला होता. संप मागे घेतल्यानंतर काही तासात एसटी धावू शकते.
जवळपास दोन महिन्यांपासून एसटी जागेवरच; टायरला चिरा ! pic.twitter.com/nfULLDtu5v
— Lokmat (@lokmat) January 25, 2022
जिल्ह्यातील आगारनिहाय एसटी
सातारा ११४
कऱ्हाड ८६
फलटण ९०
वडूज ५४
दहिवडी ४७
मेढा ४४
वाई ५३
महाबळेश्वर ४२
खंडाळा ४०
कोरेगाव ५०
पाटण ६०
कोणी या गाडीत बसा
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात एका कोपऱ्या मोठ्या प्रमाणावर गाड्या उभ्या आहेत. यातील कोणत्याच गाड्यांना कुलूप नसल्याने कोणीही येऊन आत जाऊन बसत असतात. त्याचप्रमाणे शिवशाही गाड्यांमध्येही होतात. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी शिवशाहीत जाऊन अज्ञात प्रवाशांनी गाडी पेटवली होती.
विनाकारण डिझेल जाळणे
वापरात नसलेल्या गाड्यांच्या बॅटऱ्या डाऊन होऊ नयेत म्हणून त्या अधूनमधून चालू कराव्या लागतात. त्यामुळे कर्तव्यावर असलेले चालक एसटी सुरू करून ठेवतात. तसेच आगारातून एखादा राऊंड मारत असतात. त्यामुळे विनाकारण खर्च करावा लागत असतो.
एसटी कितीही दिवस एकाच ठिकाणी उभी असली तरी फार काही नुकसान होत नाही. तरीही संबंधित टायर चिरू नये, बॅटऱ्या डाऊन होऊ नयेत म्हणून हवा भरणे, एखादी फेरी नियमित मारली जाते.
भोसले, यंत्र अभियंता चालन, सातारा.