Video : किरीट सोमैय्या कराडमध्ये स्थानबद्ध, पोलिसांनी रेल्वे स्थानकातूनच घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 09:02 AM2021-09-20T09:02:07+5:302021-09-20T09:08:04+5:30
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या वर गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते
सातारा : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर, त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले आहे. किरीट सोमैय्यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे, आता नियोजित वेळेनुसार सोमैय्यांची पत्रकार परिषद होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या वर गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव केला होता. तसेच प्रक्षोभक वक्तव्येही केली आहेत.
किरीट सोमैय्यांना कऱ्हाड रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतलं pic.twitter.com/b9ciUbPPGH
— Lokmat (@MiLOKMAT) September 20, 2021
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये म्हणून नोटीस दिली होती. तरीही, किरीट सोमैय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून मुंबईतून कोल्हापूरकडे रविवारी रात्री रवाना झाले होते. पण, सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड येथील पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ताब्यात घेतलेले आहे.
यावेळी ओगलेवाडी येथील रेल्वे स्थानकावर दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशन उपस्थित होते. किरीट सोमय्या यांना पोलीस बंदोबस्तात त्यांना ताब्यात घेऊन येथील शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले आहे.