विद्यानगरला वाढली कचऱ्याची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:56 PM2017-07-22T14:56:33+5:302017-07-22T14:56:33+5:30
ठिकठिकाणी ढीग : नागरीकांचे आरोग्य धोक्यात
आॅनलाईन लोकमत
विद्यानगर (जि. सातारा), दि. २२ : दिवसेंदिवस विद्यानगरसह सैदापुरची वाढ झपाट्याने होत असल्याने कचऱ्याची समस्या गंभीर बनत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सैदापुर ग्रामपंचायतीची यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे.
कऱ्हाड शहराचे उपनगर म्हणुन विद्यानगरकडे पाहिले जाते. शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, व्यावसायिक, दुकानदार, लहानमोठे व्यवसायीक आदींना कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायत कचरा गोळा करते; पण त्यासाठी यंत्रणा अपुरी आहे. कऱ्हाड-मसुर रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कचऱ्याची विल्हेवाट कशी आणि कुठे लावायची, हा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर आहे. ओगलेवाडी रस्त्याचीही तीच अवस्था असुन त्याही ठिकाणी कचरा दिसुन येत आहे. कचऱ्यामध्ये कागदी बॉक्स, प्लास्टीकच्या टाकाऊ वस्तू, वैद्यकीय साहित्याचे बॉक्स आदीचा समावेश आहे.
सैदापूर ग्रामपंचायतीकडून कृष्णा नदीपात्रालगत कचरा टाकला जातो. मात्र, हा प्रकारही गंभीर आहे. संबंधित कचऱ्यामुळे नदीपात्र दुषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरीकांतून केली जात आहे.