लम्पीच्या अटकावासाठी आता गावपातळीवर दक्षता समिती, सातारा जिल्हा परिषदेचा पुढाकार
By नितीन काळेल | Published: September 28, 2022 07:51 PM2022-09-28T19:51:43+5:302022-09-28T19:52:10+5:30
लम्पीबाबत गतीने उपाययोजना राबवण्यासाठी या समितीच्या माध्यमातून कामकाज होणार
सातारा : जनावरांच्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आता लम्पी आजाराला आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्तरीय सर्वेक्षण व दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. लम्पीबाबत गतीने उपाययोजना राबवण्यासाठी या समितीच्या माध्यमातून कामकाज होणार आहे.
जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव पसरत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तत्काळ उपाययोजना सुरू असून, जनावरांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. या रोगाला रोखण्यासाठी उपाययोजना करताना मनुष्यबळ कमी असले, तरी शासनाच्या निर्णयानुसार ५४ कंत्राटी पदांची तत्काळ भरती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खासगी पशुपदविकाधारकांनाही मदतीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पशुपालकांनी आजारी जनावरांवर वेळेवर उपचार करून न घेतल्यामुळे व पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क न साधल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. लम्पी आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर उपचार तत्काळ मिळाल्यास हा रोग बरा होत आहे. मात्र, आजारी जनावरांची माहिती मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत असून, रोगप्रसारही होत आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर दक्षता बाळगून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यासाठी ग्रामस्तरावर समिती स्थापन करण्यात येत आहे.
सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, गावातील प्रगत पशुपालक यांचा समितीत समावेश आहे. या आजाराची लक्षणे दिसल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधणे, आजारी जनावरांचे विलगीकरण करणे, गावातील सर्व गोठे जंतुनाशक औषधांनी फवारून घेणे, गावातील बैलगाडी शर्यतीस प्रतिबंध करणे, जनावरांच्या लसीकरणाची खात्री करणे, जनावरांच्या खरेदी-विक्री व वाहतुकीस प्रतिबंध करणे, आजाराबाबत जनजागृती ग्रामसभेत व अन्य कार्यक्रमांमध्ये करणे ही कामे ही समिती करणार आहे.
जनावरांच्या लम्पी आजाराला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये आता ग्रामस्तरावर सर्वेक्षण व दक्षता समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीमार्फत गावांमध्ये जनजागृती करणे, लक्षणे दिसल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधणे, आजारी जनावरांचे विलगीकरण करणे यासारखी कामे होणार आहेत. - विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी