विजय मल्ल्याने कर्जे बुडवली; पण शेतकऱ्यांनी फेडली असती : रामराजे
By Admin | Published: August 28, 2016 12:03 AM2016-08-28T00:03:10+5:302016-08-28T00:03:10+5:30
वार्षिक सभा: राष्ट्रीय बँकांबाबत सरकारच्या धोरणावर भाष्य
सातारा : ‘राष्ट्रीयकृत बँका उद्योगपतींना कर्ज वाटप करताना नियम पाळतात का? याचे उदाहरण विजय मल्ल्याने बुडविलेल्या कर्जावरून पुढे आले आहे. या बँकांनी मल्ल्याऐवजी शेतकऱ्यांना कर्जे दिली असती तर ती शेतकऱ्यांनी ती न बुडवता फेडली असती,’ असा उपहासात्मक टोला विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मारला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रामराजे नाईक-निंबाळकर हे बोलत होते.
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘राष्ट्रीयकृत बँकेची हजारो कोटींची कर्जे दरवर्षी बुडत आहेत. मात्र, शासनाच्या बजेटमध्ये या बँकांना आर्थिक मदतीची तरतूद केली जाते. या बँका कर्जे वाटप करताना नेमके कर्जदाराच्या संपत्तीचे मूल्यमापन करतात का?, त्याची कर्ज फेडण्याची ऐपत तपासली जाते का?, असा प्रश्न सध्या समोर येत
आहे.
उद्योगपती विजय मल्ल्याने याने दोन-दोन वेळा राष्ट्रीयकृत बँकांची कर्जे बुडविली आहेत. १० ते १५ वर्षांपूर्वी त्याने असेच कर्ज बुडवले होते, तरीही त्याला पुन्हा कर्ज वाटप करण्यात आले. असेच कर्ज शेतकऱ्यांना दिले असते तर त्यांनी व्याजासह ते फेडले असते. घेतलेले कर्ज फेडायला पाहिजे, हा संस्काराचा भाग असून, शेतकऱ्यांची ती संस्कृती आहे,’ असेही रामराजे यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)