वर्णेच्या सरपंचपदी विजय पवार तर उपसरपंचपदी कुसूम पवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:40+5:302021-02-11T04:41:40+5:30
अंगापूर वर्णे (ता. सातारा) येथे बुधवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडीत सरपंचपदी विजय बजीरंग पवार तर उपसरपंचपदी ...
अंगापूर वर्णे (ता. सातारा) येथे बुधवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडीत सरपंचपदी विजय बजीरंग पवार तर उपसरपंचपदी कुसूम किसन पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वर्णे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत भैरवनाथ-अजिंक्य पॅनेलने ११-० अशी एकतर्फी लढत जिंकत विरोधी वर्णे ग्रामविकास पॅनेलचा धुव्वा उडविला होता. सरपंच पद हे सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव झाल्याने या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली होती. सरपंच पदासाठी विजयी पॅनलमधून तीन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे सरपंच पदासाठी या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली होती. परंतु सर्वांच्या सहमतीने या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सरपंच पदासाठी विजय पवार तर उपसरपंच पदासाठी कुसूम पवार यांचे एकमेव अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. या निवडी जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून युवराज केंजळे यांनी काम पाहिले, तर सहायक निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेवक सत्यवान वाघमारे यांनी सहकार्य केले. दरम्यान, या बैठकीस नवनिर्वाचित सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच यांचा निवडणूक निर्णय अधिकारी युवराज केंजळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.