विजयसिंहचा ‘गेम’ वडापच्या वादातून !

By admin | Published: December 9, 2015 01:22 AM2015-12-09T01:22:52+5:302015-12-09T01:23:40+5:30

मुख्य सुत्रधारासह तिघांना अटक : एकजण पसार, कट रचून काढला काटा, गुन्हे शाखेने केला पर्दाफाश

Vijaysingh's game 'Wadap' promise! | विजयसिंहचा ‘गेम’ वडापच्या वादातून !

विजयसिंहचा ‘गेम’ वडापच्या वादातून !

Next

कऱ्हाड : उंडाळेतील विजयसिंह पाटील या युवकाचा खून वडापच्या वादातून झाल्याचे मंगळवारी पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून, एकजण पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच गुन्ह्यांत वापरलेली जीप व इतर हत्यारेही आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहेत. कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला.
तानाजी यशवंत पाटील (रा. वारूंजी, ता. कऱ्हाड), महिपती आबा भोसले (रा. मलकापूर, मुळ रा. येळगाव), शिवाजी संभाजी कोल्हाळे (रा. मलकापूर) व सचिन चंद्रकांत पवार (रा. मलकापूर, सध्या रा. मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंडाळेतील विजयसिंह सुखदेव पाटील (वय २८) या युवकाचा अपहरण करून खून करण्यात आला होता. दि. २८ नोव्हेंबर रोजी विट्याहून मजूर घेऊन येतो, असे सांगून विजयसिंह घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत घरी आला नाही. शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. पोलीस शोध घेत असतानाच कवठे महांकाळ येथील नागज घाटात विजयसिंहची गाडी आढळून आली. गाडीत रक्ताचे डाग होते. तसेच तेथून काही अंतरावर रक्ताने माखलेल्या स्थितीत मोबाईल व लोखंडी कमानपाटा आढळून आला. घातपाताची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. विजयसिंहबाबत गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटनांची पोलिसांनी माहिती घेतली. अशातच पनवेल येथील समुद्रानजीकच्या खाडीत विजयसिंहचा मृतदेह छिन्नविछिन्न स्थितीत सापडला. अज्ञातांनी डोक्यात व मानेवर घाव घालून त्याचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. तसेच मारेकऱ्यांनी विजयसिंहचे हातपाय तोडले होते. या क्रुरतेवरून हा खून वैयक्तीक द्वेषापोटीच झाला असण्याचा दाट संशय निर्माण झाला.
कऱ्हाड तालुका पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून या खुनाचा तपास सुरू केला. विजयसिंहचे नातेवाईक, मित्र, पाहुणे, वडाप व्यावसायिक यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी वारुंजीतील वडाप व्यावसायिक तानाजी पाटील याचे नाव समोर आले. विजयसिंहचा तानाजीशी गेल्या दोन वर्षांत वारंवार खटका उडाला होता. काहीवेळा धक्काबुक्कीही झाली होती. इतर वडाप व्यावसायिकांसमोर विजयसिंह तानाजीला अपमानास्पद वागणूक देत होता.
गाडी नंबरला लावण्याच्या कारणावरूनही दोघांमध्ये वाद व्हायचा. वडाप व्यावसायिकांकडून ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तानाजीच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले. त्यावेळी विजयसिंह बेपत्ता झाला त्यादिवशी तानाजी त्याच्या मागावर होता, हे निष्पन्न झाले. विजयसिंहच्या गाडी पाठोपाठ तानाजी एका जीपमधून विट्याच्या दिशेने गेल्याचेही उघडकीस आले. त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहायक निरीक्षक विवेक पाटील, स्वप्नील लोखंडे, उपनिरीक्षक शिंदे, हवालदार घाडगे, महेश सपकाळ, शशी काळे, अमित पवार, सचिन साळुंखे, संदेश लादे, अमोल पवार यांची वेगवेगळी पथके तयार करून गोपनीय तपास सुरू करण्यात आला.
या पथकाने तानाजीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. अखेर तानाजीने गुन्ह्याची कबूली देत वडाप व्यवसायातील वादातून आपणच कट रचून हा खून केल्याचे कबुल केले. तसेच इतर साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली. पोलिसांनी याप्रकरणात तानाजीसह त्याच्या गाडीवरील दोन चालकांना अटक केली आहे. तानाजीच्या मामाचा मुलगा सचिन पवार हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Vijaysingh's game 'Wadap' promise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.