माढ्यात उत्तम जानकर-मोहिते दिलजमाई?, भाजपसाठी टेन्शन

By नितीन काळेल | Published: April 16, 2024 06:17 PM2024-04-16T18:17:20+5:302024-04-16T18:20:42+5:30

कट्टर विरोधक एकत्रचे संकेत : विमानवारी करूनही हेलकावे 

Vijaysinh Mohite-Patil and Uttam Jankar will join forces in Madha Lok Sabha constituency?, tension for BJP | माढ्यात उत्तम जानकर-मोहिते दिलजमाई?, भाजपसाठी टेन्शन

माढ्यात उत्तम जानकर-मोहिते दिलजमाई?, भाजपसाठी टेन्शन

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघात राजकारण सतत हेलकावे खात असून, उत्तम जानकर यांनी विमानवारी करूनही भाजपच्या पाठिंब्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यातच माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधक मोहिते - पाटील यांच्याशीही हातमिळवणीबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आता जानकर काय निर्णय घेणार यावरच माढ्याचा तिढा राहणार आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मोहिते - पाटील आणि उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक. पण, आताच्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने माढ्यात राजकारण सतत बदलत चालले आहे. मोहिते - पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात गेलेत. यामुळे भाजपपुढे संकटे वाढत चाललीत. त्यातच पाठीमागील वेळी खासदार रणजितसिंह यांच्यासाठी मैदानात उतरलेले उत्तम जानकर हेही वेगळ्या भूमिकेत आहेत.

त्यामुळेच नाराजी दूर करण्यासाठी सोमवारी खासदार रणजितसिंह, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि उत्तम जानकर हे विशेष विमानाने नागपूरला गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर जानकर यांनी अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याचेही जाहीर केले. पण, सोमवारी रात्रीच कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेऊनही निर्णय दिला नाही. 

लोकसभेला मोहिते; विधानसभेला जानकर ?

माळशिरस विधानसभा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत उत्तम जानकर यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. जानकर हे राष्ट्रवादीकडून लढले तर विराेधात भाजपाचे राम सातपुते होते. आता लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी मोहिते यांना साथ द्यायची तर विधानसभेला सहकार्य घ्यायचे, असे ठरू लागल्याची माहिती समोर येत आहे.

त्यातच जानकर यांनीही मतदारसंघात भाजपाविरोधात नैराश्याचे वातावरण आहे. आम्हाला मोहिते लांबचे नाहीत. मोहिते यांच्याबरोबर युती करा, याच तालुक्यात आमदार, खासदार असावा, ही भावना लोकांमध्ये बळावली, असे वक्तव्य केले आहे. यावरून जानकर यांची मोहितेंशी जवळीक वाढल्याचेच दिसून येत आहे.


लोकसभा निवडणुकीत पाठिंबा कोणाला द्यायचा, याचा निर्णय कार्यकर्ते घेतील. यासाठी १९ एप्रिल रोजी बैठक होणार आहे. तसेच मोहिते - पाटील यांच्याकडूनही ऑफर आली आहे. साटेलोटे करण्याचा निर्णय होऊ शकतो. तरीही कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चा करून काय तो निर्णय घेणार आहे. - उत्तम जानकर

Web Title: Vijaysinh Mohite-Patil and Uttam Jankar will join forces in Madha Lok Sabha constituency?, tension for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.