सातारा बाजार समितीचे विक्रम पवारच कारभारी; ‘लोकमत’चा अंदाज ठरला खरा
By नितीन काळेल | Published: May 25, 2023 12:57 PM2023-05-25T12:57:59+5:302023-05-25T12:59:36+5:30
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी झाली होती. या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने ३० वर्षांपासूनची सत्ता कायम राखली.
सातारा : सातारा बाजार समितीच्या कारभाऱ्यांची निवड झाली असून आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी विक्रम पवार यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर उपाध्यक्षपदी मधुकर पवार यांची वर्णी लागली. या निवडीनंतर अजिंक्य पॅनेलन गुलाल उधळून आनंद साजरा केला. तर सभापतीनिवडीबाबत ‘लोकमत’ने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी झाली होती. या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील अजिंक्य पॅनलने ३० वर्षांपासूनची सत्ता कायम राखली. तसेच विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पॅनलचा सुफडासाफ करत सर्व १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. या निवडणुकीत पॅनेलचे रमेश विठ्ठल चव्हाण, धनाजी जाधव, राजेंद्र महादेव नलावडे, मधुकर परशुराम पवार, विक्रम लालासो पवार, विजय उत्तम पोतेकर, भिकू भाऊ भोसले, वंदना किशोर कणसे, आशा मंगलदास गायकवाड, इसूब शमशुद्दीन पटेल, दत्तात्रय लक्ष्मण कोकरे, आनंदराव कल्याणराव कणसे, अरुण बाजीराव कापसे, शैलेंद्र राजाराम आवळे, संजय ज्ञानदेव पवार, अमिन शकूर कच्छी, बाळासाहेब यशवंत घोरपडे, अनिल बळवंत जाधव हे निवडून आले होते.
गुरुवारी बाजार समिती सभापती आणि उपसभापतींची निवड झाली. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी विक्रम पवार यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. त्यामुळे विक्रम पवार यांना दुसऱ्यांदा सभापतीपद मिळाले आहे. तर उपसभापतीपदी मधुकर पवार यांना संधी देण्यात आली. विक्रम पवार हे महामार्गाच्या पश्चिम बाजुचे तर मधुकर पवार हे पूर्व भागातील आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंनी दोन्ही भागात प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे.