सातारा : विलासराव उंडाळकरांना विधानपरिषद मिळाली तर आनंदच : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:32 PM2018-05-11T15:32:57+5:302018-05-11T15:33:58+5:30
काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर मला आनंदच होईल. कऱ्हाड तालुक्यात आणखी एक आमदार वाढेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड : आगामी काळात विधानपरिषदेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. त्यातील दोन काँग्रेस व एक राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल. त्यात जर काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर मला आनंदच होईल. कऱ्हाड तालुक्यात आणखी एक आमदार वाढेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड येथे चव्हाण यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी उंडाळकरांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार असल्याचे समजते. याबाबत छेडले असता पृथ्वीराज चव्हाण यांनी वरील मत व्यक्त केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विधानपरिषदेवर कोणाला संधी द्यायची, हे काही माझ्या हातात नाही. हा निर्णय काँग्रेस पक्ष किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे घेतील. सध्या तेथे माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे असे तिघेजण सदस्य आहेत. यातील कोणाला थांबवायचे? कोणाला संधी द्यायची, हा सर्वस्वी निर्णय पक्ष घेईल.
कऱ्हाड तालुक्यात सध्या बाबा-काका गटाच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारले असता त्यांनी फक्त स्मितहास्य करणे पसंद केले. त्यानंतरही पत्रकारांनी उंडाळकर तर कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या पाठीशी राहा, असे सांगताहेत. असा मुद्दा मांडताच यातून त्यांना तर भाजपला मदत करू नका, असेच सांगायचे आहे, असेही ते म्हणाले.
भाजपमधीलही अनेक मंडळी आज त्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांना रामराम करू लागले आहेत. मोदी हटावचा नारा देत आहेत आणि उंडाळकरांनी तर अनेक वर्षे काँग्रेसचेच काम केले आहे, असेही चव्हाण यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.