पुस्तकांच्या गावात पन्नास वाचक करणार बारा तास वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:08 PM2018-10-12T16:08:52+5:302018-10-12T16:11:17+5:30
पुस्तकांच्या गावी भिलार येथेही वाचनध्यास या सलग वाचनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी दिली.
पाचगणी (सातारा) : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, दि. १५ आॅक्टोबर रोजी राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या ती वर्षांत या निर्णयाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याही वर्षी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम योजण्यात आले आहेत.
पुस्तकांच्या गावी भिलार येथेही वाचनध्यास या सलग वाचनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर यांनी दिली.
वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर, शनिवार दि. १३ व रविवार दि. १४ आॅक्टोबर या दोन दिवसांत राज्यातील एकूण ५० वाचक, आपल्या आवडत्या पुस्तक घरात सुमारे १२ तास पुस्तक-वाचन करणार आहेत.
वाचन कौशल्यांचा विकास आणि वाचनसंस्कृतीचे संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांना पूरक अशा या उपक्रमास संपूर्ण राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. संगणक अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, एस. टी. वाहक अशा विविध प्रकारचे ५० नोंदणीकृत चोखंदळ वाचक सलग वाचनासाठी भिलारला येणार आहेत.
या नोंदणीकृत वाचकांची निवासाची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आली आहे. नोंदणीकृत वाचकांव्यतिरिक्त इतर वाचकही स्वखचार्ने या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. ग्रंथचळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, भाषासंवर्धक श्याम जोशी व मराठीचे अभ्यासक डॉ. प्रकाश परब यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारण्याची संधी दि. १३ आॅक्टोबर रोजी या उपक्रमातील सहभागींना मिळणार आहे.
दि. १४ रोजी सायकाळी ५ वाजता भिलार येथेच पाऊसवेळा हा साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमही योजण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क आहे, अशी माहितीही डॉ. काटीकर यांनी दिली.