CoronaVirus Satara : खराडे गावाने कोरोनाला वेशीबाहेरच रोखले, पहिल्या लाटेतून घेतला बोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 02:55 PM2021-05-07T14:55:17+5:302021-05-07T14:56:48+5:30

CoronaVirus Satara : मसूर व हेळगांव भागातील अनेक गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असला तरी याला खराडे ता. कराड हे गाव अपवाद ठरले आहे. या गावामध्ये आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. आपला गाव कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी गावातील हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवत संपूर्ण गाव एकवटला आहे.

The village of Kharade stopped Corona just outside the gate, taking a lesson from the first wave | CoronaVirus Satara : खराडे गावाने कोरोनाला वेशीबाहेरच रोखले, पहिल्या लाटेतून घेतला बोध

CoronaVirus Satara : खराडे गावाने कोरोनाला वेशीबाहेरच रोखले, पहिल्या लाटेतून घेतला बोध

Next
ठळक मुद्देखराडे गावाने कोरोनाला वेशीबाहेरच रोखले, पहिल्या लाटेतून घेतला बोध गावाच्या सर्व सीमा बंद; संक्रमण रोखण्याचा गावकऱ्यांचा निर्धार

मसूर : मसूर व हेळगांव भागातील अनेक गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असला तरी याला खराडे ता. कराड हे गाव अपवाद ठरले आहे. या गावामध्ये आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. आपला गाव कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी गावातील हेवेदावे, राजकारण बाजूला ठेवत संपूर्ण गाव एकवटला आहे.

कोरोना संक्रमणाच्या प्रतिबंधासाठी ग्रामपंचायत, कोरोना समिती व संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेतली व त्यामध्ये करावयाच्या उपाययोजनासंबंधी चर्चा झाली. सर्वानुमते गावच्या सीमा सील करण्याचा ठराव झाला. त्यानुसार गावामध्ये येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. गावामध्ये येणाऱ्यांची कसून चौकशी करूनच त्याला सोडले जात आहे.

या गावातून हेळगांव, पाडळी, मसूर या ठिकाणाहून येणारे प्रवासी जवळचा रस्ता म्हणून पेरले पुलाचा आधार घेत राष्ट्रीय महामार्गावर जात आहेत. तर राष्ट्रीय महामार्गावरून वाठार, पाडळी, मसूरकडे जाण्यासाठी याच गावातून जायला रस्ता आहे. त्यामुळे या सर्व लोकांची योग्य ती चौकशी करूनच त्यांना गावामध्ये प्रवेश दिला जात आहे.

नाकाबंदी केली आहे तेथे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. गावाचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे यासाठी सर्वांची धडपड सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. सुमारे दोन हजार लोकवस्तीच्या या गावात अनेकांचे पाहुणे आहेत; परंतु या कालावधीत पाहुण्यांना येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तर गावातील लोकांनी कारणाशिवाय गावाबाहेर पडायचे नाही, असा निर्णय घेण्यात आल्याने गावातील लोक आपल्या घरात सुरक्षित आहेत.

गाव कृष्णा नदीकाठी वसलेले असल्याने गावचा शिवार संपूर्ण बागायत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी सवलत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये काम करावे अन्यथा दिवसभर झाडाच्या सावलीचा आधार घेत शेतातच थांबावे, असा निर्णय झाल्याने शेतीची कामेही झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी सरपंच सुनीता संजय कदम, उपसरपंच विक्रम गुरव, सदस्य मोहन बर्गे, संतोष जाधव, अधिक कांबळे, उमाजी मदने, संदीप जाधव, बाळू जाधव, सचिन जाधव, ग्रामसेवक रमेश माळी यांसह गावकामगार, तलाठी, कृषी अधिकारी रणपीसे, शिक्षकवर्ग, आरोग्य विभाग, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व युवकांचा आरोग्यपूर्ण लढा सुरू आहे.

संपूर्ण गाव एकवटले

खराडे गावामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अनेक रुग्ण आढळून आले होते. गावाने कोरोना काळात काय यातना सहन कराव्या लागतात याचा अनुभव घेतला आहे. परंतु दुसऱ्या लाटेमध्ये गाव अजूनही कोरोना रुग्णांपासून दूर राहिले आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढ्याला संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.

Web Title: The village of Kharade stopped Corona just outside the gate, taking a lesson from the first wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.