गावोगावी बैठका... घराघरांत प्रचार !

By admin | Published: September 13, 2016 12:41 AM2016-09-13T00:41:14+5:302016-09-13T00:45:47+5:30

मराठा क्रांती मोर्चाची तयारी : कऱ्हाडातही नियोजनासाठी चौदा समित्यांची स्थापना

Village meetings ... house-to-house publicity! | गावोगावी बैठका... घराघरांत प्रचार !

गावोगावी बैठका... घराघरांत प्रचार !

Next

कऱ्हाड : सातारा येथे ३ आॅक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या विराट मराठा क्रांती मोर्चाची तारीख ठरली आहे. आता बैठका घेऊन चर्चा करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यवाही करा आणि प्रत्येक घराघरांत जाऊन मराठी बांधवांना एकत्र करा, त्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून, सर्व नियम पाळून कामे करू या, असा निर्धार कऱ्हाड येथील मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आला.
सातारा येथे रविवारी जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या नियोजित मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनंतर कऱ्हाड येथे मराठा बांधवांच्या वतीने सोमवारी सोनाई मंगल कार्यालयात मोर्चाच्या अनुषंगाने नियोजित बैठक घेण्यात आली. या बैठकीला दोनशेहून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सातारा येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी कऱ्हाडमधूनही मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी एकत्रित जायचे आहे. त्यासाठी कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येक मराठा बांधवांच्या घराघरांत जाऊन प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने गावपातळीवर प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली कमिट्या स्थापन करा त्यातून बैठक घेऊन मार्गदर्शन करा व मोर्चासाठी एकत्र करा, अशा अनेक विषयांवर कऱ्हाड येथे सोमवारी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. शासकीय परवानगीसह तालुक्यातील गण, गटांमधील गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रत्येक जबाबदारी स्वत:हून घ्यावी, असे आवाहनही बैठकीदरम्यान करण्यात आले.
दरम्यान, कऱ्हाड तालुक्यातून मराठा क्रांती मोर्चा मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शनाने काढण्यात येणार आहे. सातारा येथे ३ आॅक्टोबर रोजी मोर्चाला जाण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावागावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील लोकांना एकत्र घेऊन येणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांसह गावातील व्यक्तींची माहिती त्यांचे फोन क्रमांक, नाव यांच्या नोंदी करण्यासाठी कऱ्हाड येथील मलकापूर येथे जनसंपर्क कार्यालय उभारले जाणार आहे. या कार्यालयात तीन व्यक्तींची नेमणूक असून, त्यांच्याकडे प्रमुख कार्यकर्त्यासह गावातील व्यक्तींचे नाव, फोन क्रमांक नोंदविले जाणार आहे. ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, एसएमएस आदींच्या माध्यमातून नियोजन कळविले जाणार आहे. (प्रतिनिधी)


शनिवारी पुन्हा कऱ्हाडात नियोजन बैठक
सातारा व कऱ्हाड या दोन्ही ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी बावीसच दिवस उरले आहेत. यावर नियोजन करण्यासाठी शनिवार, दि. १७ रोजी सकाळी एक वाजता सोनाई मंगल कार्यालय मलकापूर कऱ्हाड येथे पुन्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी अनेकांनी केले.
प्रचारासाठी आकर्षक ध्वनीमुद्रीत कॅसेट अन् बॅनरही
मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी खेड्यात प्रत्येक घराघरांत प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. यासाठी आकर्षक घोष वाक्याचे ध्वनीमुद्रीत कॅसेट आणि घोषणाचे बॅनरही तयार करण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या आचारसंहितेचे पालन करून परवानगी घेऊन लवकरच हे कॅसेट आणि बॅनर तयार केले जाईल असाही निर्णय यावेळी बैठकीदरम्यान घेण्यात आला.

२ आॅक्टोबरच्या ग्रामसभेतही करणार चर्चा
सातारा येथे ३ आॅक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी सर्वत्र सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नियोजन बैठकाही घेतल्या जात आहेत. कऱ्हाड येथेही सोमवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये २ आॅक्टोबरला प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेत मराठा क्रांती मोर्चाबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात यावी, असा निर्णयही बैठकीदरम्यान घेण्यात आला.

Web Title: Village meetings ... house-to-house publicity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.