न्हावी बुद्रुक गावाचे नामांतराने झाले जयपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:26 AM2021-07-10T04:26:58+5:302021-07-10T04:26:58+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक या गावाच्या जयपूर या नामांतरास प्रदीर्घ प्रयत्नानंतर यश मिळाले आहे. यासाठी सातारा लोकसभा ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील न्हावी बुद्रुक या गावाच्या जयपूर या नामांतरास प्रदीर्घ प्रयत्नानंतर यश मिळाले आहे. यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे विशेष प्रयत्न कामी आले.
रहिमतपूर-औंध या रस्त्यावर असलेल्या न्हावी बुद्रुक या गावाचे नाव जातिवाचक असल्यामुळे ते बदलून जयपूर करावे, अशी मागणी गावचे सरपंच, जयपूर नामांतर समिती तसेच ग्रामस्थांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. नामांतराचा प्रस्ताव तयार करणे व पाठपुरावा करण्याचे काम नंदकुमार माने, विकास निकम, धनाजी फडतरे, विष्णुदास सुर्वे, तानाजी साळुंखे, शंकर कोकीळ, अशोक माने, महेश दळवी, गणेश फडतरे व संदीप निकम या जयपूर नामांतर समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या पाठिंब्याने पूर्ण केले. हा प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा, विभागीय कार्यालय पुणे व महाराष्ट्र शासन यांचेमार्फत केंद्रीय ग्रहमंत्रालय दिल्ली यांचेकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावास केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून १९ मे २०२१ रोजी मान्यता मिळून न्हावी बुद्रुक या गावचे नाव बदलून जयपूर करण्यात आले. याबाबत दि. २३ जून रोजी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिध्द झाले.
न्हावी बुद्रुक गावाचे नाव बदलून जयपूर झाल्याची व अथक प्रयत्नांना यश मिळाल्याची माहिती खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली. या वेळी जयपूरच्या सरपंच प्रियंका माने, नामांतर समिती, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, तसेच गावातील विविध मंडळे व ग्रामस्थ यांचेमार्फत खासदार श्रीनिवास पाटील यांचा त्यांचे निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.
फोटो : ०९जयपूर
जयपूर, ता. कोरेगाव हे नाव देण्यास विशेष प्रयत्न केल्याबद्दल खासदार श्रीनिवास पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (छाया : जयदीप जाधव)