एक गाव एक गणपतीला ५२२ मंडळांची साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:30 AM2018-09-18T00:30:00+5:302018-09-18T00:30:04+5:30
सातारा : गटबाजी थांबली की वाद टळतात. यासाठी गटा-तटाचे निमित्तच राहू नये व गावाने एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला साद देत तब्बल ५२२ मंडळांनी एक गाव एक गणपती संकल्पना अंमलात आणली आहे. विशेष म्हणजे ही सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक ७४ गावांचा पुढाकार आहे.
गावात उत्सवात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने एक गाव एक गणपती ही संकल्पना गेल्या आठ-दहा वर्षांपासून अधिक बळ धरत आहेत. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी यंदापासून यावर अधिक भर दिल्याने ही संकल्पना चांगलेच मूळ धरत गावागावात एकोपा निर्माण करण्याच्या कामाला चांगलीच गती मिळाली आहे. विशेष म्हणजे उणेदुणे व मंडळातील स्पर्धा बाजूला ठेवत ग्रामस्थांचा सहभाग लक्षणीय ठरला आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांच्या बैठका घेतला. मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत समन्वय साधत एक गाव एक गणपती या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तब्बल ५२२ गावांनी प्रतिसाद दिला आहे.
विशेष म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येची गावे देखील सलग दुसऱ्या वर्षी एकोप्याने सहभागी होत आहेत. आता ज्या गावांमध्ये एकच गणपती आहे, अशा गावात गणेशोत्सवाच्या निमित्ताने दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, महिला सक्षमीकरण, आरोग्य अशा विविध विषयांची जनजागृती होत आहे. बालभोजन, कीर्तनाचे कार्यक्रम व विविध स्पर्धाचे आयोजन होत आहेत. इतर खर्चाला फाटा देत गावभोजनावर खर्च केला जात आहे.
पोलीस ठाणेनिहाय
मंडळांची संख्या
सातारा शहर-१, सातारा तालुका-४१, बोरगाव-१७, कºहाड ग्रामीण-३४, उंब्रज-२५, वाई-३३, महाबळेश्वर-१६, पाचगणी-१४, मेढा-७४, भुर्इंज-२५, कोरेगाव-१२ पुसेगाव-२४, रहिमतपूर-१०, वाठार-२२, वडूज-१२, दहिवडी-२३, म्हसवड-१६, औंध-७, फलटण शहर-१, फलटण ग्रामीण-६, लोणंद-१८, खंडाळा-१०, शिरवळ-१३, पाटण-२६, कोयनानगर-१४, ढेबेवाडी-२५
एक मंडळ, एक पोलीस कर्मचारी
सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, एक पोलीस कर्मचारी ही आगळी-वेगळी संकल्पना राबविण्यात आली आहे. हे पोलीस कर्मचारी पोलीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणार असून, गणेशोत्सव शांततेत पार पडण्यास मदत होणार आहे.
गणराया अॅवॉर्ड स्पर्धा पुन्हा सुरू
गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या गणराया अॅवॉर्ड स्पर्धेत खंड पडला होता. मात्र, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ही स्पर्धा पुन्हा सुरू करून गणेश मंडळांच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.