Satara: अंगावर दरड कोसळल्याने ग्रामपंचायत कर्मचारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 01:21 PM2024-05-23T13:21:01+5:302024-05-23T13:21:32+5:30

सणबूर : ढेबेवाडी-दिवशी घाटात जुळेवाडीकडून ढेबेवाडीकडे दुचाकीवरून येत असताना दत्त मंदिराच्या पुढच्या बाजूच्या धोकादायक वळणावर अचानक दरड कोसळली. यामध्ये ...

Village panchayat employee injured after landslides in Satara | Satara: अंगावर दरड कोसळल्याने ग्रामपंचायत कर्मचारी जखमी

Satara: अंगावर दरड कोसळल्याने ग्रामपंचायत कर्मचारी जखमी

सणबूर : ढेबेवाडी-दिवशी घाटात जुळेवाडीकडून ढेबेवाडीकडे दुचाकीवरून येत असताना दत्त मंदिराच्या पुढच्या बाजूच्या धोकादायक वळणावर अचानक दरड कोसळली. यामध्ये असवलेवाडी येथील ग्रामपंचायत कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. जयवंत बाळकू चव्हाण (वय ५५, असवलेवाडी, ता. पाटण) असे जखमी झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती की, असवलेवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीचे कर्मचारी जयवंत चव्हाण हे बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून ढेबेवाडीला कामानिमित्त निघाले होते. ते दिवशी घाटातील दत्त मंदिराच्या पुढच्या वळणावर पाण्याच्या धबधब्याजवळ आल्यावर डोंगरातून अचानक दरड कोसळली व ती गाडीवर आल्याने ते खाली कोसळले. घाटातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी थांबून त्यांची विचारपूस करून संबंधिताच्या घरातील लोकांना या घटनेची तत्काळ माहिती दिली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कऱ्हाड येथे नेण्यात आले.

घाटात दरडी हटविण्याचे काम सुरू..

सध्या या घाटात रस्ता रुंदीकरण व दरडी हटविण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या घाटात सतत दरडी कोसळत असतात. घाटात या दरडींनी अनेकांना जायबंदी केल्याच्या घटना घडल्या आहेत. हा घाट अतिशय बिकट व धोकादायक असून, या घाटातून प्रवास करताना घाट संपेपर्यंत मनात सतत धाकधूक सुरू असते.

मालदन ते दिवशीपर्यंतचा घाट अतिशय धोकादायक असून, समोरून येणारे वाहनही दिसत नाही. शिवाय, पावसाळ्यात सतत दरडी कोसळत असतात. त्यामुळे या घाटातून प्रवास करताना सावधानता बाळगावी लागते. सध्या घाटातील दरडी हटविण्याचे काम सुरू असून, पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पूर्ण दरडी हटविण्यात याव्यात. -रुपेशकुमार भोई, प्रवासी, मंद्रुळकोळे खुर्द

Web Title: Village panchayat employee injured after landslides in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.