शिलेदारांच्या गावातच विरोधी टक्का

By admin | Published: October 26, 2014 09:16 PM2014-10-26T21:16:22+5:302014-10-26T23:28:15+5:30

पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गट : राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची डोकेदुखी वाढणार

In the village of Shaleedar | शिलेदारांच्या गावातच विरोधी टक्का

शिलेदारांच्या गावातच विरोधी टक्का

Next

कमलाकर खराडे- पिंपोडे बुद्रुक -फलटण विधानसभा मतदारसंघातील पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात सर्वच पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराने लक्षणीय मते मिळवून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे राष्ट्रवादीला रोखण्यात विरोधकांना यश आलेले नाही.
जिल्हा परिषदेच्या पिंपोडे बुद्रुक गटात मुळातच काँग्रेस पक्ष आणि त्याचे नेतृत्व फारसे कधी जाणवत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते काँग्रेसला कधी आपला विरोधक मानत नाहीत. येथे निवडणुका होतात, त्यामुळेच राष्ट्रवादीच्या दोन गटांत त्यात एकमेकांना त्रास देण्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.
गेल्या दोन लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता येथे निवडणुकीत स्थानिक नेते विरुद्ध जनता अशी परिस्थिती पाहावयास मिळाली आहे. अगदी शरद पवारांच्या विरोधात सुभाष देशमुख यांना मतदान करणारी जनता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटलांच्या विरोधात नवख्या सदाभाऊ खोतांच्या पाठीशी उभी राहिली. या गटातील राष्ट्रवादीच्या शिलेदारांकडून विकासकामांना गती न मिळाल्यामुळे मतदार विरोधी भूमिका बजावू लागला. तरीही मतदारांना गृहित धरले असल्यामुळे या विधानसभेला गटातून तीन अंकी मताधिक्याचा आकडाही पार करता आला नाही.
रामराजेंची भूमिका ठरणार निर्णायक
फलटण मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रा. दीपक चव्हाण, काँग्रेसचे दिगंबर आगवणे, स्वाभिमानीचे पोपटराव काकडे, शिवसेनेचे डॉ. नंदकुमार तासगावकर उमेदवार होते. येथील लढत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच झाली. फलटणची यावेळची निवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी नव्हती. माजी पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जवळपास एक महिनाभर मतदारसंघात तळ ठोकत ‘राजे गट’ सक्रिय केला आणि आपला उमेदवार निवडून आलातरच आपले खरे नाहीतर अवघड आहे, असे कार्यकर्त्यांना बजावले. परिणामी राष्ट्रवादी ताकदीने लढली. त्यामुळे आता त्यांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे.
नेत्यांच्या गावांतच राष्ट्रवादीला झटका
कोरेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्यमान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लालासाहेब शिंदे यांच्या करंजखोप गावात राष्ट्रवादीला ५७८, तर विरोधात ७११ मते मिळाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर यांच्या सोळशीत राष्ट्रवादी ५८२, तर विरोधात ४०६ मते, शरद पवारांचे मूळ गाव व विद्यमान पंचायत समिती सदस्या जयश्री रासकर यांच्या नांदवळ येथे राष्ट्रवादीला ६५७, तर विरोधात ५२२ मते, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सतीश धुमाळ, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव धुमाळ, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश धुमाळ यांच्या सोनकेत राष्ट्रवादीला ८७५, तर विरोधात ६८२ मते, विद्यमान पंचायत समिती सदस्य अशोकराव लेंभे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्य अमृतराव जायकर, कविता साळुंखे, सुरेश साळुंखे या तिघांसह भक्कम राष्ट्रवादीची फौज असलेल्या पिंपोडे बुद्रुक येथे राष्ट्रवादीला १,२७१ तर विरोधात १,३५८ मते मिळाली आहेत. ही आकडेवारी पाहिली असता राष्ट्रवादीच्या भक्कम बुरुजाला कधीही भगदाड पडू शकते; कारण शिलेदारांच्या गावातच विरोधी मतदानाची धार अधिक तीव्र होताना दिसू लागली आहे.
राष्ट्रवादी नेत्यांना
चिंतनाची गरज
मोठ्या निवडणुकीत मतदार विरोधात का जातो? याचे चिंतन अजून तरी राष्ट्रवादीकडून झालेले पाहावयास मिळत नाही. गेली तीस वर्षांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात असलेल्यांनी आता युवकांच्या खांद्यावर जबाबदारी द्यावी, असे सूचक वक्तव्यही काहीवेळा रामराजेंनी जाहीर सभेत केले आहे. मात्र, त्यातील गांभीर्य अजूनही इथल्या नेत्यांना समजलेले दिसत नाही. परिणामी विरोधी टक्का वाढण्यात आला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, त्यामुळे येथील नेत्यांनी आता तरी चिंतन करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: In the village of Shaleedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.