गावोगावी एल्गार... जय मल्हार!
By admin | Published: March 13, 2017 10:53 PM2017-03-13T22:53:56+5:302017-03-13T22:53:56+5:30
मल्हार क्रांतीसाठी रणरागिणीही सज्ज : धनगर समाजाच्या बैठका अन् भेटींचा धडाका; दहिवडीतील मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात
सातारा : धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दहिवडी येथे दि. १६ रोजी मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी माता अहिल्यादेवी रणरागिणी सेना कार्यरत झाली आहे. या सेनेच्या माध्यमातून माण तालुक्यातील विविध गावे, वाडी-वस्त्यांवर बैठका घेण्यात येत असून, त्याद्वारे महिलांना मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या गाव अणि वाडी-वस्तीतील महिला दि. १६ च्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. आजअखेर आरक्षण मागणीसाठीचे २० हजारांच्या आसपास अर्ज माण तालुक्यातील धनगर बांधवांनी भरल्याची माहिती संयोजकांनी दिली. ‘ना कोणत्या नेत्याचा, ना कोणत्या पक्षाचा, मोर्चा फक्त धनगर समाजाचा’ अशा घोषणा देत धनगर बांधव सक्रिय झाल्याने निघणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
बारामती येथील धनगर समाजाच्या मोर्चादरम्यान तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचा फडणवीस यांना विसर पडला आहे. दिलेल्या आश्वासनाचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरण करून देण्यासाठी मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली दहिवडी येथे १६ मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोर्चात आपलाही सहभाग असावा, यासाठी महिला आक्रमक झाल्या असून, माता अहिल्यादेवी रणरागिणी सेनेच्या माध्यमातून महिलांनी गावे आणि वाडी-वस्त्यांवर बैठकांचा धडाका लावला आहे. बैठकांदरम्यान गाव आणि वाडी-वस्तीतील महिला चूल बंद ठेवत दि. १६ रोजी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. ‘ना कोणत्या नेत्याचा ना कोणत्या पक्षाचा मोर्चा फक्त धनगरांचा’ या संकल्पनेला महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
‘आता नाय तर कधीच नाय’ असे बोलून दाखवत महिला मोर्चासाठी आक्रमक झाल्या आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी घरातील व इतर कामे अगोदरच आटोपून घेण्यात सध्या महिलावर्ग गुंतला असल्याचे चित्र माण तालुक्याच्या विविध गावे आणि वाडी-वस्तीत दिसून येत आहे. (प्रतिनिधी)