तलावातील गाळ काढण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2016 09:29 PM2016-05-10T21:29:42+5:302016-05-11T00:10:25+5:30

म्हावशीत लढा दुष्काळाशी : दीडशे एकर क्षेत्र येणार ओलिताखाली; दुष्काळ कायमचा हटविण्याची प्रतिज्ञा

The villagers gathered to collect pond mud | तलावातील गाळ काढण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

तलावातील गाळ काढण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

Next

खंडाळा : तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. यावर मात करण्यासाठी म्हावशी, ता. खंडाळा येथील ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. लोकसहभागातून गावच्या तलावातील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता गावच्या समस्येसाठी गावकऱ्यांचे श्रमदान आणि आर्थिक योगदानातून जलसंधारणाचे सुरू केलेले काम तालुक्यासाठी आदर्शवत ठरत आहे.
म्हावशी गाव सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच अग्रभागी राहिले आहे. गावचे सुशोभीकरण, वृक्ष लागवड, क्रीडांगण यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन काम केले आहे. यावर्षी गावच्या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय घट झाली. पिण्याच्या पाण्यावर गावकऱ्यांनी टंचाईमुक्तीसाठीही प्रयत्न केले.
मात्र, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गावातील लोकांनी मिळून गावची वर्गणी जमा केली. त्यातून तलावातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढविण्याचे काम सुरू केले. त्यामुळे म्हावशी गावातील सुमारे १०० ते १५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शिवाय पाणीसाठवणामुळे परिसरातील विहिरींचीही पाणीपातळी वाढीस लागेल.
ग्रामस्थांचे योगदान, गावच्या हद्दीतील कंपन्यांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या मदतीने हे मोठे काम पूर्णत्वास जाणार आहे. गाळ काढण्याच्या या मोहिमेचा शुभारंभ तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या हस्ते झाला. यावेळी गावच्या सरपंच स्वाती माळी, उपसरपंच विठ्ठल राऊत, महेश राऊत, शिवाजी माळी, मंडलाधिकारी एन. सी. महाडिक, गावकामगार तलाठी जोतिराम दगडे, शारदा राऊत, तुळशीराम राऊत, बंडूतात्या राऊत, बाळू राऊत, दत्तात्रय गाढवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावच्या यात्रेचा खर्च वाचवून जलसंधारणासाठी खर्च करणारे हे तालुक्यातील पहिले गाव आहे. त्यामुळे हे काम इतरांना प्रोत्साहित करणारे आहे. (प्रतिनिधी)

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी म्हावशी ग्रामस्थांनी उचललेले पाऊल इतर गावांना प्रेरणादायी आहे. गावच्या लोकसहभागाला प्रशासनाचे सहकार्य राहील. जलसंधारणाची इतरही कामे हाती घेऊन शाश्वत पाणीसाठा निर्माण करता येईल. त्यासाठी लोकांनी पुढे यावे.
- शिवाजीराव तळपे,
तहसीलदार, खंडाळा

खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या उपस्थितीत तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.

Web Title: The villagers gathered to collect pond mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.