‘जमिनीवरचे’ नाना-मकरंद गावकऱ्यांना भावले!
By Admin | Published: December 17, 2015 10:35 PM2015-12-17T22:35:54+5:302015-12-17T22:59:44+5:30
‘नाम’कडून जलसंधारणाची पाहणी : गुढ्या उभारून स्वागत; मिंधेपण टाळून स्वयंभू बनण्याचा ग्रामस्थांना संदेश
वाठार स्टेशन : मिंधे झाल्यामुळं तुमचा बोलण्याचा अधिकार नाहिसा होतो. स्वयंभू बनण्याचं सामर्थ्य ठेवा. सगळं जग उजळून टाकण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नसलं तरी त्यातला एक भाग जरी स्वयंपूर्ण केला तरी ते पुरेसं होईल...
हिरवा तीन बटनांचा गावरान शर्ट, लेंगा, खांद्यावर पांढरं उपरणं. पायात कातडी चप्पल. काळ्या-पांढऱ्या दाढीसह एरवी ‘डॅशिंग’ दिसणाऱ्या चेहऱ्यावर गोल चष्म्यामुळं आलेला सौम्यपणा आणि ओठातून बाहेर पडणारे अन्नदात्या शेतकऱ्याविषयीचे कृतज्ञतेचे उद््गार... अभिनेते नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राचा फेव्हरिट मकरंद अनासपुरे यांच्यासमवेत खटाव आणि कोरेगाव तालुक्यातल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना शाबासकी देताना परावलंबित्वाचं जोखड फेकून देण्याचा मौलिक सल्लाही दिला.
नलवडेवाडीकरांनी नाना आणि मकरंदचे गुढ्या उभारून स्वागत केले. ‘गावाला पुढे नेण्यासाठी एकोपा महत्त्वाचा आहे; पण तो हरवत चाललाय. गाव एक कुटुंब म्हणून वावरायला लागलं की, विकासाला वेग येतो. ही प्रक्रिया अव्याहत सुरू राहण्यासाठी एकदिलाने काम करा. नाम फाउंडेशन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील,’ अशी ग्वाही पाटेकर यांनी नलवडेवाडी ग्रामस्थांना दिली.
यावेळी नूतन ग्रामपंचायत कार्यालय व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचेही उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, नाम संस्थेचे विश्वस्त राजीव सावंत, डॉ. अविनाश पोळ, प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार अर्चना तांबे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, रवींद्र रांजणे, क्रांती बोराटे, उपविभागीय कृषी अधिकारी भुजबळ, सरपंच सुषमा नलवडे यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
नाना उवाच...
मी कोणत्याही पक्षाचा नाही; पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा कुणी असेल तर त्याच्यापुढे मी नक्की हात जोडेन.
लोकप्रतिनिधींनी काय करावं याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्याला काय योग्य वाटतं ते करत राहावं.
राजकीय पक्षांच्या विरोधात बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा कृती सुरू करणं महत्त्वाचं.
आपल्याला आयुष्यात पाप करायला वेळच मिळू नये एवढं पुण्य करावं. कोणत्याही धर्मात न अडकता!
रस्त्यावर आल्यावर आपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत, याचं भान हवं.
नानांचा गावकऱ्यांना शब्द...
‘जाखणगावला पुन्हा येईन’
खटाव : तालुक्यातील जाखणगावने लोकसहभाग व शासानाच्या सहकार्यातून जलक्रांती केली आहे. येथील जलसंधारणाचे काम पाहण्यासाठी आणि ठिबक संचाची भेट देण्यासाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे आले. मात्र, कौटुंबिक अडचणीमुळे नाना पाटेकर यांनी फक्त एकाच शेतात ठिबकचे उद्घाटन केले नाम फाउंडेशनने ५0 एकर क्षेत्रात ५0 शेतकऱ्यांना या ठिबक संचाचे वाटप करुन गावाला सहकार्य केले आहे. कौटुंबिक अडचणीमुळे दौरा आटोपता घ्यावा लागत असल्याने नानांनी दिलगिरी व्यक्त केली. इतका वेळ आपली वाट पहात उभ्या असलेल्या लोकांशी नाना काही वेळ बोलले अन् पुन्हा येण्याचा शब्द देऊन ते मार्गस्थ झाले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक
‘नाम फाउंडेशनला प्रशासकीय अधिकारी पुढे येऊन मदत करत नाहीत; पण येथे वेगळा अनुभव आला. एवढे अधिकारी उपस्थित आहेत, हे पाहून आनंद वाटला. असे सामाजिक कार्यासाठी झोकून देणारे अधिकारी असल्यावर विकासप्रक्रिया थांबू शकत नाही. अंगावरील इस्त्रीची कपडे आपुलकी कमी करतात. इस्त्री कपड्याला नाही मनाला असायला हवी,’ अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
नाम फाउंडेशन हे नाना किंवा मकरंदची खासगी मालमत्ता नाही. ही संस्था चालवायला आपल्याला दुसरी पिढी उभी करायची आहे. आम्ही फक्त पोस्टमन आहोत.
- नाना पाटेकर
आज गावागावाचे उकिरडे झाले आहेत ते केवळ राजकीय वैमनस्यामुळेच. त्यामुळे यापुढे निवडणुका सण म्हणून साजरा करावा का, असा प्रश्न पडतो.
- मकरंद अनासपुरे